Thursday, February 2, 2023

टाटांच्या हाती एअर इंडियाचे भवितव्य सुरक्षित- मीना इंगळे नाईक

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुंबई : केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले एअर इंडिया आता टाटांनी चालवायला घेतले आहे. त्यामुळे आता ही एअरलाईन्स सेवा अतीशय उत्तम प्रकारे होईल, त्यात सुधारणा होईल आणि प्रवाशांच्या सुविधा सुद्धा ्आढू शकतील, असे सुस्पष्ट मत एअर इंडिया ची प्रदीर्घ सेवा सर्वोत्तम प्रकारे बजावून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी सौ. मीना इंगळे नाईक यांनी व्यक्त केले.

बोरीवलीच्या शिवसेवा क्रीडा प्रेक्षागृहातील सभागृहात ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या एअर इंडिया, सेलिब्रिटी आणि मी या विषयावर माजी अधिकारी मीना इंगळे नाईक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. ख्यातनाम उद्योगपती रतन टाटा यांची साधी राहणी उच्च विचारसरणी याचे पुरेपूर आलेले अनुभव मीना इंगळे नाईक यांनी कथन केले.

- Advertisement -

विमानतळावर अति महत्वाच्या व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, त्यांचे पारपत्र (पासपोर्ट) बोर्डिंग पास, आसन व्यवस्था या सर्व प्रकारच्या बाबी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे यावेळी होणारे वर्तन या संदर्भात विविध अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचे अनुभव सांगितले. एअर इंडिया टाटांनी घेतल्यानंतर कर्मचारी सुद्धा आनंदित झाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. मीना इंगळे नाईक या स्वतः उत्तम दर्जाच्या कलावंत, अभिनेत्री असल्याने त्यांनी विविध चित्रपटात केलेल्या भूमिका आणि त्या संदर्भातील किस्से सांगितले.

सूर्यकांत,  चंद्रकांत ही मराठी चित्रपट क्षेत्रातील गाजलेली जोडी, त्यांनी मीनाताई यांना दिलेला बहिणीचा दर्जा, बोरीवलीच्या जय जय महाराष्ट्र नगरातील एका खोलीत राहणाऱ्या मीनाताई यांच्या घरी  सूर्यकांत चंद्रकांत यांनी केलेली  भाऊबीज, मराठी चित्रपट क्षेत्रात रौप्यमहोत्सवी चित्रपटांची देणगी देणाऱ्या ख्यातनाम चित्रपट निर्माते दिग्दर्शक अभिनेते दादा कोंडके यांच्या बरोबर आलेले अनुभवाचे किस्से सांगतांनाच मीनाताई इंगळे यांनी आपण सच्चाई, सत्यता, सचोटीने आणि परखडपणे वागलो तर आपल्याला आनंदी आयुष्य जगता येते, हा आवर्जून सल्ला दिला. संघर्षाच्या भट्टीतून तावूनसुलाखून नंतर आनंदी आयुष्य आपण कसे आपले जीवन जगत आहोत हे त्यांनी सांगितले. विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करुन सामाजिक बांधिलकी कशाप्रकारे जपता येते याचेही त्यांनी साद्यंत उदाहरण दिले.

ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा रुचिरा दिघे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात स्मिता चितळे यांनी स्वागत, मृणालिनी वैद्य यांनी भक्ती गीत, उषा कुळकर्णी यांनी मीनाताई यांचा परिचय, विजय केसाळे यांनी गीत गायन, सुमन राऊत यांनी अनुभव कथन, ललिता मेनन यांनी विश्रामधाम माहिती, तात्यासाहेब पिंपळे यांचे एअरलाईन्स अनुभव,  शेजवलकर यांनी देणगी वाचन, रुचिरा दिघे यांनी समारोप, मृणालिनी वैद्य यांनी पसायदान अशा प्रकारे कार्यक्रमांची रेलचेल होती.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे