रेशनच्या धान्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री; गुन्हा दाखल

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील रेशनदुकान धारकाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मिळणारे आठ महिन्याचे मोफत धान्याची परस्पर काळ्याबाजारात विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात रेशनदुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील चिखली येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक (22) चे परवानाधारक आजाबराव सिताराम पाटील रा. चिखली ता. मुक्ताईनगर यांना शासनाकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या काळात लाभार्थ्यांसाठी मोफत धान्य वाटप करण्यासाठी धान्य वितरीत करण्यात आले होते. पुरविण्यात आलेल्या धान्यांपैकी ७० क्विंटल गहू, ३६ क्विंटन तांदूळ आणि साडे आठ क्विंटल दाळ यांची परस्पर विल्हेवाट लावून शासनाची फसवणूक केली आहे.

याबाबत मुक्ताईनगर पुरवठा निरीक्षक ऋषीकेश तानाजी गावडे (वय २७) यांच्या फिर्यादीवरून रेशनदुकानदार आजाबराव सिताराम पाटील याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ हे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.