शेअर बाजार कोसळला.. सेन्सेक्स 1200 तर निफ्टी 355 अंकांनी घसरला

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

विदेशी फंडाची सतत होणारी आवक आणि आशियाई बाजारातील संमिश्र कल यामुळे देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवातच सोमवारी कमकुवत झाली. कमकुवत सुरुवातीनंतर बाजारातील घसरण ही चांगलीच वाढली.

एचडीएफसी बँक (HDFC Bank), इन्फोसिस (Infosys), आयसीआयसीआय (ICICI) बँक आणि एचडीएफसी हेवीवेट समभागांमध्ये विक्री केल्याने सेन्सेक्स 1,220 अंकांनी खाली 57,425.22 वर तर निफ्टी 355 अंकांनी घसरून 17200 च्या खाली गेला. क्षेत्रीय निर्देशांकात निफ्टी पीएसयू बँक वगळता सर्व क्षेत्रे हे लाल चिन्हातच व्यवहार करत आहेत.

सेन्सेक्समध्ये सर्वाधिक 3 टक्क्यांहून अधिक घसरण ही एल अँड टी मध्ये झाली आहे. एचडीएफसी बँक, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, भारती एअरटेल, डॉ रेड्डीज, मारुती आणि एचडीएफसीचे समभागही सुरुवातीच्या व्यवहारात घसरले. तर दुसरीकडे, टाटा स्टील, पॉवरग्रीड, एसबीआय आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. मागील सत्रात सेन्सेक्स 143.20 अंकांनी म्हणजेच 0.24 टक्क्यांनी घसरून 58,644.82 अंकांवर बंद झाला. तर NSE चा निफ्टी 43.90 अंकांनी किंवा 0.25 टक्क्यांनी घसरून 17,516.30 वर बंद झाला.

बाजारातील कमजोरीमुळे गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला आहे. त्यांची 2.34 लाख कोटी रुपयांहून अधिक एकूण संपत्ती बुडाली. एकूण BSE सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप शुक्रवारी 2,67,71,278.74 कोटी रुपये होते, जे सोमवारी 2,34,947.67 कोटी रुपयांनी घसरून 2,65,36,331.07 कोटी रुपये झाले.

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यानंतर, आरबीआयने सांगितले की सरकारी रोखे, विदेशी चलन आणि बाजार सोमवारी बंद राहतील.

विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) फेब्रुवारीच्या पहिल्या चार व्यापार सत्रांमध्ये भारतीय बाजारातून 6,834 कोटी रुपये काढले. दुसरीकडे, शेअर बाजाराच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) भांडवली बाजारात निव्वळ विक्री करणारे होते. शुक्रवारी त्यांनी 2,267.86 कोटी रुपयांचे शेअर्स विकले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने दर-निर्धारण चलनविषयक धोरण समितीची (MPC) बैठक काही दिवसांसाठी पुढे ढकलली आहे. RBI ने निवेदनात सांगितले आहे की, “भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने 7 फेब्रुवारी 2022 ही सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यामुळे, MPC बैठकीचे वेळापत्रक आता 8 ते 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत बदलण्यात आले आहे.” तज्ञांचे मत आहे की रिझर्व्ह बँकेची चलनविषयक धोरण समिती (MPC) तरलता सामान्यीकरण प्रक्रियेचा भाग म्हणून पॉलिसीची भूमिका ‘मध्यम’ वरून ‘तटस्थ’ आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये बदलू शकते. पुढील द्विमासिक पतधोरण येत्या गुरुवारी जाहीर केले जाईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.