अब की बार पाच लाख पार; मुख्यमंत्री पुत्राला गोळीबार महागात ?

शिंदेंचे ‘कल्याण’ भाजपची चिंता वाढवणार ?

0

ठाणे, लोकशाही न्युज नेटवर्क 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याणमधून खासदारकीची हॅट्ट्र्रिक करण्याच्या प्रयत्नात आहे. कल्याणमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानात वाढ झाली आहे. यंदा मतदानात 4 टक्क्यांची वाढ झाली आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्थ्यावर पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दोन टर्मचे खासदार असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्यापुढे ठाकरेसेनेच्या वैशाली दरेकर यांचे आव्हान आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘अब की बार पाच लाख पार’ची घोषणा दिली. तेव्हापासून शिंदेंचा प्रचार मताधिक्याच्या  भोवतीच फिरत राहिला. त्यांनी 2 मे रोजी उमेदवारी अर्ज भरला. यानंतर प्रचाराची दिशा बदलली. मतदानाच्या दिवशी सकाळची वेळ वगळता कल्याण पूर्व, मुंब्रा, कळवा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाने वेग घेतला. महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवली, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर मतदारसंघांच्या तुलनेत मुंब्रा-कळवा परिसरात झालेले मतदान महायुतीला चिंतेत टाकणारं आहे. डोंबिवली, कल्याण मतदारसंघांमधील हजारो मतदारांची नावे यादीत नसल्याने त्यांना मतदान करताच आले नाही. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे.

कल्याण पूर्व, मुंब्रा आणि कळवा, उल्हासनगरातील काही भागांत वैशाली दरेकरांनी जोरदार प्रचार केला. तिथून त्यांना अधिक मतदानाची अपेक्षा आहे. तिथे अधिक मतदान झाल्यामुळे दरेकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कळवा मुंब्रामधून 2 लाख 16 हजार 159, कल्याण ग्रामीणमधून 2 लाख 31 हजार 162, कल्याण पूर्वमधून 1 लाख 56 हजार 235 मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. तर डोंबिवलीत 1 लाख 42 हजार 142, उल्हासनगरात 2 लाख 31 हजार 505, अंबरनाथमध्ये 1 लाख 66 हजार 407 मतदान झाले आहे.

 

शिंदेंना भोवणार गोळीबार?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्याचे पडसाद राजकारणात उमटले. भाजप, सेनेतील दुरावा वाढला. त्याचे प्रतिबिंब मतदानात उमटणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गोळीबार प्रकरणानंतर भाजपने शिंदे पितापुत्रांविरोधात भूमिका घेतली. त्यांचे फोटो बॅनरवरुन हटवले होते.

 

शिंदेंचे लीड भाजपला महागात पडणार?

श्रीकांत शिंदेंना 5 लाख मतांनी विजयी करण्याचा निर्धार त्यांचे वडील एकनाथ शिंदेंनी केला. हा निर्धार त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवला. श्रीकांत शिंदे 5 लाख मतांनी विजयी झाल्यास त्यांचे राजकीय वजन आणखी वाढेल. त्याचे परिणाम भविष्यात भाजपला सहन करावे लागतील. शिंदे यांची कल्याणवरील पकड आणखी घट्ट होईल. ते आगामी राजकारणात भाजपला जड जाईल, याची कल्पना पक्षाच्या नेत्यांना आहे. त्यामुळे शिंदेंना खरंच 5 लाखांचं मताधिय मिळणार का याबद्दल चर्चा सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.