“राष्ट्रवादीचा मोठा नेता तुरुंगात जाणार”; मोहित कंबोज यांच्या ट्वीटमुळे खळबळ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन मोठे नेते मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) सध्या तुरुंगात आहेत. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचा एक मोठ नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटणार आहे, असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही सध्या मुंबईतील (Mumbai) आर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Jail) आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याकडे मोहित कंबोज यांनी इशारा केला आहे, असा प्रश्न या ट्वीटनंतर उपस्थित झाला आहे. दरम्यान मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री उशिरा तीन ट्वीट केले आहेत. त्यापैकी दुसऱ्या ट्वीटमध्ये “2019 साली परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्या काळात बंद करण्यात आलेल्या सिंचन घोटाळ्याची (Irrigation Scam Case) पुन्हा चौकशी झाली पाहिजे,” असा उल्लेख आहे.

राज्यातील सिंचन घोटाळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव आले होते. 2019 साली लाचलुचपत प्रतिबंध विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी क्लीन चिट दिली होती. ACB ने 19 डिसेंबर 2019 रोजी हायकोर्टात सादर केलेल्या शपथपत्रात अजित पवार यांना क्लीन चिट दिल्याचे स्पष्ट केले होते. तत्कालीन ACB चे महासंचालक परमबीर सिंह यांनी कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, “या चौकशीत/तपासात प्रतिवादी क्रमांक 7 (अजित पवार) विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचं उत्तरदायित्व आढळलं नाही.”

तर मोहित कंबोज यांनी केलेल्या आणखी एका ट्वीटमध्ये आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याचा पर्दाफाश करणार असल्याचे म्हटले आहे. “भारत आणि परदेशातील मालमत्तेची यादी, बेनामी कंपन्या, गर्ल फ्रेंड्सच्या नावावरील संपत्ती, मंत्री म्हणून विविध खात्यांमध्ये केलेला भ्रष्टाचार, कौटुंबिक उत्पन्न आणि मालमत्तेची यादी,” या गोष्टींचा पर्दाफाश करणार असल्याचं त्यांनी म्हटले.

मोहित कंबोज यांनी ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेमक्या कोणत्या नेत्याकडे इशारा दिलाय, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.