नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. स्पर्धेच्या सुरूवातीला संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या शमीला भारतीय संघात स्थान मिळताच त्याने ‘पंजा’ मारला. दोन सामन्यांमध्ये पाच-पाच आणि एका सामन्यात सात बळी घेऊन शमीने दबदबा निर्माण केला. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या शमीबद्दल अनेक टिप्पणी केली जात आहे. मात्र अभिनेत्री पायल घोषने एक अजबच विधान करून चाहत्यांचे लक्ष वेधले होते.
पायल घोष नेहमी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तिने मोहम्मद शमीला थेट लग्नाची मागणी घातली होती. शमीबरोबर लग्न करण्यासाठी तयार असल्याचे पायलने म्हटले. तिने शमीपुढे लग्नासाठी एक अटही ठेवली. “शमी तुझं इंग्लिश सुधार, मी तुझ्याबरोबर लग्नासाठी तयार आहे”, अशी पोस्ट पायलने केली. २ नोव्हेंबरला भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यादरम्यान ही पोस्ट पायलने केली होती. या पोस्टनंतर पायल घोष प्रसिद्धीच्या झोतात आली.
https://x.com/iampayalghosh/status/1720134156473020568?s=20
अभिनेत्रीच्या या विधानाबद्दल मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँला विचारले असता तिने हे सेलिब्रेटींच्या बाबतीत होतच असल्याचे म्हटले. शमीने न्यूझीलंडविरूद्धच्या उपांत्य सामन्यात सात बळी घेतल्यानंतर हसीन जहाँने आनंद व्यक्त केला. तसेच पायल घोषच्या विधानाबद्दल विचारले असता तिने म्हटले, “हे सर्वकाही सेलिब्रेटींच्या बाबतीत होतच असते.. सेलिब्रेटींना नेहमी लग्नासाठी प्रपोजल्स येत असतात. ”