नर्सरी ते पहिली प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

नर्सरी (प्ले ग्रुप), ज्युनिअर केजी, सीनिअर केजी आणि पहिली अशा चार इयत्तांसाठी वयाची कमाल मर्यादा घालण्यात आली असून, या इयत्तांसाठी जास्तीत जास्त किती वय असावे, हे प्राथमिक शिक्षण विभागाकडून (Department of Elementary Education) स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी कमाल वयाची मर्यादा ठरवण्यासाठी जून महिना मानक म्हणून मानला जात होता. मात्र, जुलै ते डिसेंबर महिन्यात जन्माला आलेल्या मुलांना एक वर्ष उशिराने प्रवेश मिळायचा. हे टाळण्यासाठी आता प्राथमिक शिक्षण विभागाने ३१ डिसेंबर ही मानीव तारीख म्हणून जाहीर केली आहे.

यानुसार २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादा घालून देण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर टेमकर यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार ३१ डिसेंबर २०२२ रोजी प्ले ग्रुप, नर्सरीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे जास्तीत जास्त वय चार वर्ष पाच महिने ३० दिवस इतके निश्चित करण्यात आले आहे.

ज्युनिअर केजीसाठी हे वय पाच वर्षे पाच महिने ३० दिवस, सीनियर केजीसाठी सहा वर्षे पाच महिने ३० दिवस आणि पहिलीसाठी सात वर्षे पाच महिने ३० दिवस इतके निश्चित करण्यात आले आहे. या वयापेक्षा अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित वर्गांमध्ये प्रवेश न देता पुढील वर्गात प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

वयोमर्यादेसंबंधीची माहिती सर्व शाळा, संस्थाचालक, मुख्याध्यापक, आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली असून, अधिकाऱ्यांनी या परिपत्रकानुसार शाळांना सूचना द्याव्यात. वयोमर्यादेवरून शिक्षण विभागात अनेक तक्रारी येतात. या तक्रारी येऊ नयेत, यासाठी हे परिपत्रक जाहीर केले असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

इयत्ता — दिनांक — कमाल वय

प्ले ग्रुप, नर्सरी — ३१ डिसेंबर २०२२ — ४ वर्ष ५ महिने ३० दिवस

ज्युनिअर केजी ३१ डिसेंबर २०२२ — ५ वर्ष ५ महिने ३० दिवस

सीनिअर केजी — ३१ डिसेंबर २०२२ — ६ वर्ष ५ महिने ३० दिवस

पहिली — ३१ डिसेंबर २०२२ –७ वर्ष ५ महिने ३० दिवस

Leave A Reply

Your email address will not be published.