‘.. तर पाणीही नाही घेणार’, मनोज जरांगेंचा इशारा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मराठा आरक्षण दिवसेंदिवस चिघळत जातंय. त्याच पाश्र्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. सरकारला दिलेला वेळ संपत आहे. राज्य सराकरने २४ तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाहीत तर २५ तारखेपासून मी आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार आहे. या उपोषणादरम्यान पाणी, औषधे काहीही घेणार नाही. हे कठोर उपोषण असणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

२५ तारखेपासून साखळी उपोषण 

यावेळी जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कुठल्याही राजकीय नेत्याला येऊ दिले जाणार नाही. आरक्षण घेतल्यानंतर गावात यायचं. महाराष्ट्रभर सर्कलमध्ये २५ तारखेपासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. २८ पासून तेच साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात होणार आहे, याची तयारी मराठा समाजाने केली आहे. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात मराठा समाजाने सरकारला जागे करण्यासाठी एकत्र यावे. व शांततेत आंदोलन करावे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मोदी महाराष्ट्रात येईपर्यंत.. 

तसेच मनोज जरांगे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येईपर्यंत आरक्षण दिले तर गुलाल भरुन गाड्या येतील. नाहीतर माणसं भरून गाड्या येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मात्र आंदोलन शांततेत होणार. संपूर्ण देश शांततेचं युद्ध कसं असतं हे पाहणार आहे, सरकारने आमचे लोक आमच्या विरोधात उतरवले आहेत. मात्र मराठ्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून लढावं. कुणीही आत्महत्या करु नये. राणे आणि कदमांच्या भूमिकेवर आता बोलणार नाही. सरकारला ४० दिवस देऊन सन्मान केला. आता २५ तारखेनंतर सरकारवर परिणाम होईल, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.