वर्धा येथे आजपासून ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

0

महात्मा गांधी साहित्यनगरी / लोकशाही न्यूज नेटवर्क

महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा वैचारिक वारसा पुढे चालविणाऱ्या वर्धा नगरीत यंदाचे ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज होत असून आजपासून राज्यभरातील हजारो साहित्यप्रेमी वर्ध्यात दाखल झाले आहे. 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान साहित्य संमेलन होणार असून सरस्वतांची मांदियाळी जमणार आहे.

स्वावलंबी विद्यालयाच्या प्रांगणात 1969 साली म्हणजे 53 वर्षांपूर्वी साहित्य संमेलन पार पडले होते. याच प्रांगणात यंदाचे संमेलन होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक, न्यायमूर्ती (निवृत्त) नरेंद्र चपळगावकर संमेलनाचे अध्यक्ष आहेत. पटांगणाला महात्मा गांधी साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. एकूण 23 एकरांचा हा परिसर सुसज्ज करण्यात आला आहे. यामध्ये सहा भव्यदिव्य मंडप उभारले आहेत. मुख्य सभामंडपाला आचार्य विनोबा भावे यांचे तर मुख्य व्यासपीठाला प्राचार्य राम शेवाळकर यांचे नाव देण्यात आले आहे.

याच व्यासपीठावर शुक्रवार, 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.कार्यक्रमाला मावळते संमेलनाध्यक्ष भारत सासणे, ज्येष्ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास, आमदार डॉ. विश्वजीत कदम, डॉ. पी. डी. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. त्याआधी ग्रंथदिंडी निघणार असून अखिल भारतीय महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.