मनपा अभियंत्यास कानशिलात लगावली ; एकावर गुन्हा

0

जळगाव : गटारीचे बांधकाम रोखत मनपाच्या युनिट कार्यालयात येवून भुपेंद्र प्रकाश कुलकर्णी (रा. देवेंद्र नगर, महाबळ परिसर) याने महापालिकेचे शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांच्या कानशिलात लगावल्याची घटना दि.२ रोजी दुपरी १ वाजेच्या सुमारास घडली. तसेच तू माझा नोकर झाला आहे, असे म्हणत त्याने शिवीगाळदेखील केल्याचे प्रसाद पुराणिक यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

शहरातील नूतन वर्षा कॉलनी परिसरात मनपा फंडातून गटारींचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी दि.२ फेब्रुवारी रोजी दुपारी भुपेंद्र कुलकर्णी
हा गेला व तेथे ठेकेदार व मिस्तरींना काम लगेच बंद करा असे सांगितले. तसेच शाखा अभियंता प्रसाद पुराणिक यांच्या मोबाईलवर संपर्क साधत गटारीचे चुकीच्या पध्दतीने होत असून गटारीला लेव्हल नसल्याचे सांगत कामावर येण्यास सांगितले. त्यावेळी पुराणिक यांनी मी सर्वेक्षणाचे काम करत असून तुम्ही भाऊच्या उद्याना जवळील युनिट कार्यालयात या, असे सांगितले. त्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास भुपेंद्र कुलकर्णी तेथे आला व शिवीगाळ करत पुराणिक कोण आहे, असे ओरडू लागला. अभियंत्यांनी त्यांची ओळख दिली व काय काम आहे,

असे विचारले. त्या वेळी कुलकर्णी याने पुराणिक यांच्या थेट कानशिलात लगावली. त्यात पुराणिक यांचा चष्मा तुटला असून कुलकर्णी याने ‘तुला कोठे तक्रार करायची आहे तू कर, मी पाहून घेईल’ अशी धमकी दिली. या प्रकरणी पुराणिक यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून भुपेंद्र कुलकर्णी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप बोरुडे करत आहेत. दरम्यान, मनपाच्या सर्व अभियंत्यांनी पोलीस स्टेशन गाठत घटनेच्या निषेध व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.