सर्वांगीण विकासासाठी गरज महात्मा फुलेंच्या कृषी-विषयक विचारांची

0

लोकशाही विशेष लेख

 

आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होऊन आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. स्वातंत्र्य पूर्व काळ आणि स्वातंत्र्यानंतरचा काळाचा विचार केला तर आज देखील विकासासाठी आधुनिक युगात आपल्या बुद्धीला विचार करणे भाग पाडत आहे. कारण विकासासंर्दभात आजसुद्धा अनेक समस्यांना आपली अर्थव्यवस्था सामोरे जात आहे. आपण सर्वाना माहित आहे की, भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे. स्वातंत्र्यप्राप्ती पासून आपल्या राजकर्त्यांनी वेगवेगळी विकासासाठी महत्वाची ध्येय, धोरणे, उपक्रम, कार्यक्रम, राबविले थोडक्यात त्याचे नियोजन केलेले दिसते. मात्र ७५ वर्षाच्या दीर्घकालावधीनंतर देखील भारतीय शेतीची दुरावस्था आपल्याला लक्षात येते याची कारणे काय आहे. हा प्रश्न आपल्याला येथे लक्षात घेणे गरजेचे आहे.

भारतात वेगवेगळ्या विचारसरणीचे थोर विचारवंत होऊन गेले त्यांनी त्या-त्या कालावधीत वेगवेगळ्या सुधारणा करून तत्कालीन समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आणि बरेच यश देखील आले. एवढेच नव्हे तर या थोर विचारवंतांच्या विचारसरणीची आजच्या आधुनिक युगात खूप गरज आहे असे मला वाटते. त्यातील प्रमुख म्हणजे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule). या महान व्यक्तीच्या शेती विषयक विचारांची गरज आपल्याला आजच्या सर्वांगीण विकासाठी महत्वाची आहे. आज भारताची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बेरोजगारी, दारिद्र्य, उपासमार, राहणीमानाचा दर्जा, या समस्यांची तीव्रता आपल्या देशात लोकसंख्येच्या तुलनेत दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे याला एकच कारण आहे, ते म्हणजे बेरोजगारी.

आज सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था रोजगाराबाबत कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे, हा अतिरिक्त भार पेलण्याची जबाबदारी आज कृषी क्षेत्रावरच आहे. मात्र आज विकासाची जी ध्येय आपण ठरवलेली आहे त्यात कुठेतरी आपण भरकटत आहोत असे या थोर विचारवंतांच्या विचारांचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते. महात्मा फुले यांच्या मते, कोणत्याही देशाचे तीन आधारस्तंभ असतात ते म्हणजे त्या देशातील शेतकरी, सैनिक, आणि प्रशासकीय वर्ग या तीन आधारस्तंभावरच त्या देशाची सुस्थिती अवलंबून असते. महात्मा फुले यांच्या काळात या तीन घटकांपैकी सर्वात पहिला घटक जो शेतकरी याची निकृष्ट अवस्था होती तर सर्वात उत्कृष्ट अवस्था ही शेवटच्या घटकाची होती आणि ती आजच्या तत्कालीन परिस्थितीला पण लागू पडते. त्यावेळी सैनिकांना पगार मिळत असे आणि सरकारी अधिकाऱ्यांना पगारा बरोबरच अनेक सवलती मिळत परंतु देशाचा महत्त्वाचा आधारस्तंभ जो शेतकरी आहे, त्यांची मात्र दयनीय अवस्था होती.

ही दयनीय अवस्था शेतकऱ्यांची लक्षात घेऊन १८८३ मध्ये महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि त्या समस्या सोडविण्यासाठी वेगवेगळ्या उपाय-योजना तसेच देशाच्या आर्थिक विकासामध्ये शेतकरी म्हणजेच शेती क्षेत्राचे विकासात असलेले महत्त्व हे सर्व आपल्या विचारसरणीतून या ग्रंथात त्यांनी विचार मांडले. त्यात त्यांनी शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी जलव्यवस्थापन त्यासाठी नदीजोड प्रकल्प, पाठबंधारे, जमिनीचे तुकडीकरण थांबविण्यासाठी भूधारण क्षेत्र एकत्रीकरण त्यासाठी सामुहिक शेती, शेतकऱ्यांचे सावकारी शोषण थांबण्यासाठी सरकार मार्फत वित्त पुरवठा करणे, शेतकऱ्यांना कृषी विषयक प्रशिक्षण देणे, सरकारी अधिकाऱ्यामार्फत होणारी पिळवणूक थांबवणे, विविध शेतीविषयक साहित्य पुरविणे, कृषीरक्षक योजना राबविणे, विविध योजना परिस्थितीनुसार राबविणे, कृषी पूरक उद्योग ग्रामीण भागात केंद्रित करणे, अशा महत्वाच्या उपाय योजना महात्मा फुले यांनी भारतात कृषी व्यवस्थेच्या विकासासाठी सुचविल्या आहेत आणि त्या आजही महत्त्वपूर्ण आहे.

त्याहीपेक्षा लोकांचा शेतकऱ्यांविषयीचा दृष्टिकोन आज बदलायला हवा शेतकऱ्याचे दारिद्र्य विषयक जीवन सर्वांनी जाणून घ्यावे त्यांचे वास्तव जीवन जवळून पाहावे समाजातील सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे त्याचे विस्मरण होऊ नये त्यांच्या सुस्थितीवर समाजाचा देशाचा सर्वांगीण विकास अवलंबून आहे. समाजाचा शेतकरी व कृषी हाच कणा आहे, त्याला केंद्रस्थानी ठेवून सर्व गोष्टींचे आजच्या शासनकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवून नियोजन केले पाहिजे. त्यांच्या कष्टावर समाजातील इतरांचे जीवन अवलंबून आहे. याची सर्वांनी जाणीव ठेवणे आज काळाची गरज आहे, हा दृष्टिकोन स्वीकारल्या-शिवाय शेतकरी सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्त होणार नाही तसेच शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबणार देखील नाही. सामाजिक समता आर्थिक सुबत्ता निकोप एकता यांचा विचार महात्मा फुले यांच्या विचारांमध्ये दिसून येतो. भूमी आणि भूमिपुत्र यांच्या शिवाय आपल्या अर्थव्यवस्थेला विकसनशीलतेकडून विकसिततेकडे जाणे अशक्य आहे. महात्मा फुले यांच्या मते शेतकऱ्यांचे जीवन दारिद्र्यात कर्जफेडित जाते एवढेच नव्हे तर त्यांचा अंतही दारिद्र्यातच होतो. दारिद्र्याच्या दृष्टचक्रात अडकलेला हा शेतकरी आज सुद्धा आपल्याला दिसतो.

देशात शेती क्षेत्रात असलेली जोखीम, अनिश्चितता व वेळोवेळी शासकीय धोरणांमध्ये होणारे बदल शेतकऱ्यांची मध्यस्थ, दलाल यांच्यामार्फत किमतींबाबत होणारी फसवणूक आपल्याला आज ही दिसते. या वेगवेगळ्या समस्यांना आधुनिक युगात देखील शेतकऱ्याला सामोरे जावे लागत आहे. या सर्व कारणांना कंटाळून शेतकरी शेवटचा पर्याय निवडतो तो म्हणजे आत्महत्या म्हणून देशात दिवसेंदिवस अनेक राज्यांमध्ये शेतकरी आत्महत्या समस्येची तीव्रता आपल्याला वाढताना दिसते. आज आपण जर या थोर विचारवंतांचा विचार अंमलात आणला तर आपल्याला आज शेती क्षेत्रात शेतकरी, शेतमजूर या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांच्या वेगवेगळ्या समस्यांची सोडवणूक करणे सोपे होईल. मात्र आज आपण राज्यशासन आणि केंद्रशासन अशा वेगवेगळ्या नियमांची विभागणी करतो. मात्र शेतकऱ्यांसाठी आज वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या असलेल्या मालाच्या किमती, धोरणे, योजना, उपक्रम, कार्यक्रम, यांच्यामध्ये जी विषमता दिसून येते. त्यामुळे आज शेतकऱ्याच्या आर्थिक, सामाजिक विकासात आपल्याला असमतोल निर्माण झालेला दिसतो आणि हा असमतोल दूर करण्यासाठी आपल्याला थोर विचारवंत महात्मा फुले या कृषी-तज्ञांच्या विचारांची गरज आज सुद्धा जाणवते.

निलेश रविंद्र कोळी
संशोधक विद्यार्थी
कवयित्री बहिणाबाई चौधरी,
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव.
मो.नं: ८००७७६०६८१

Leave A Reply

Your email address will not be published.