उद्योजकांच्या प्रगतीवर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होणार – खा. उन्मेश पाटील

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उद्योजक व्यापाऱ्यांचे हक्काचे व्यासपीठ -ललित गांधी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरने राज्यातील उद्योजक, व्यापारी यांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबर अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांत पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर, मुंबईचे अध्यक्ष ललित गांधी  यांच्या अध्यक्षतेखाली ‘अध्यक्षांशी संवाद’ महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स जळगाव कार्यालयाने आयोजित केला होता. कार्यक्रमाला जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दिनांक 22 डिसेंबर 2022 पासूनचा आजतागायत केलेल्या कार्याचा आढावा संगीता पाटील यांनी उपस्थितांसमोर प्रास्ताविकात मांडला तसेच महाराष्ट्राचे चेंबर ऑफ कॉमर्सला जिल्ह्यात अधिक मजबूत करुन जळगाव जिल्ह्यातील उद्योग व्यापार वाढीसाठी एकत्रित येऊन कसे काम करता येईल यावर विचार मंथन केले. पुढे ललित गांधी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, उत्पादक असला तरी तो कुठे ना कुठे ग्राहक असून त्याला आपापसात व्यवहार वाढवण्याची नितांत गरज असून हा व्यवहार वाढवण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स प्रयत्नशील आहे. नवतरुणांसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स संजीवनी ठरत असून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची यंग कमिटी ही सातत्याने अभ्यास करत आहे. पुढे व्यापाराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र चेंबरला महाराष्ट्रातील उत्पादन विक्रीसाठी इंडोनेशिया सरकारने जागा दिली असून 13 लोकांना व्यापार करण्याच्या ऑर्डर तात्काळ मिळाले आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने 29 देशांबरोबर सामंजस्य करार करून देशांतर्गत किंवा विदेशात व्यापार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अंतर्गत जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी करत असलेल्या पाठपुराव्याचा लेखाजोखा वाचून दाखविला. पुढे महाप्रीत बरोबर केलेल्या सोलर कराराची संपूर्ण संक्षिप्त माहिती देऊन दुबई येथे होऊ घातलेल्या महाबीज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

जळगाव जिल्ह्यातील निर्यातदारांना ‘सर्टिफिकेट ऑफ ओरिजन’ सेवेचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला. विविध उत्पादने व कृषी उत्पादनांना निर्यातीच्या संधी,  वीज दरवाढीला पर्याय म्हणून भांडवल गुंतवणूक न करता ‘रिन्यूऐबल एनर्जी’ उपलब्धतेसाठी महाराष्ट्र चेंबरचा विशेष उपक्रम, जीएसटी, फूड सेफ्टी ऍक्ट, बाजार समिती संबंधित अडचणींवर उपाययोजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले. पुढे ललित गांधी यांच्यासमोर उद्योजक अरविंद दाहाड यांनी दुहेरी वीज प्रश्न, राजेंद्र चौधरी यांनी वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट, त्रिवेणी माळी यांनी शासनाची उदासीनता तर प्रवीण पगारिया यांनी व्यापारांमध्ये असलेल्या समस्यांचा उहापोह ललित गांधी यांच्यासमोर मांडला. यावर ललित गांधी यांनी सकारात्मक विचार मंथन केले असून उद्योजक व्यापाऱ्यांना धीर दिला.

पुढे जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेष पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकप्रतिनिधी या नात्याने महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून आलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी बांधील आहे व त्यासाठी केंद्रशासन आपल्या सोबतीला राहील. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मार्फत जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास साठी केलेल्या प्रयत्नाबद्दल मी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई व जळगाव कार्यालयाचे कामाचे कौतुक करतो असे गौरव उद्गार त्यांनी काढले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील उद्योजक व व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी व समस्यांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा असून नक्कीच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे बोलून दाखविले. तसेच उद्योजकांच्या व व्यापाऱ्यांच्या सकारात्मकतेवर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अवलंबून असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

उपस्थित उद्योजक व व्यापाऱ्यांचे आभार उद्योजक महेंद्र रायसोनी यांनी मानले असून कार्यक्रमासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बैठकीला गव्हर्निंग कौन्सिल मेंबर महेंद्र रायसोनी, किरण बच्छाव, नितीन इंगळे यांच्यासह जिल्हातील उद्योजक व्यापारी चेंबर चे सभासद यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.