महाराष्ट्रातील विमानसेवांना गती देणार : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील विमानसेवांना गती देण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे विशेष प्रयत्न केले जातील अशी ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी व पदाधिकाऱ्यांना सिंधिया यांनी बैठकीसाठी दिल्ली येथे आमंत्रित केले होते. सदर बैठकीत चर्चा करताना त्यांनी ही ग्वाही दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या सद्यस्थितीचा व महाराष्ट्राच्या अपेक्षांचा अहवाल त्यांना सादर केला.

विशेषता जळगाव, नांदेड, गोंदिया व लातूर या विमानसेवेसाठी पूर्ण असलेल्या विमानतळावरून त्वरित विमानसेवा सुरू करावी अशी आग्रही मागणी केली.
राज्यातील विविध विमानतळांच्या प्रश्नी महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री सिंधीया यांची कोल्हापूर दौऱ्याच्या वेळी भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी या प्रश्नासंदर्भात नवी दिल्ली येथे चेंबरच्या पदाधिकारी यांच्या सोबत बैठकीचे आश्वासन दिले होते. शुक्रवारी शिष्टमंडळाने त्यांची नागरी उड्डाण मंत्रालय, राजीव गांधी भवन नवी दिल्ली येथे भेट घेतली.

दिल्ली येथे झालेल्या बैठकीत चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील विविध विमातळाविषयीचा चेंबरतर्फे सविस्तर अहवाल सादर केला. कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणाची कामे गतीने पूर्ण करावीत व कार्गो टर्मिनल सेवा सुरू करावी अशी मागणी केली. त्या वेळी मंत्री सिंधीया यांनी ही कामे गतीने पूर्ण करण्याची व कार्गो सेवा सुरू करण्याची ग्वाही अध्यक्ष गांधी यांना दिली. महाराष्ट्रातील जळगाव, नांदेड, गोंदिया, लातूर या पूर्ण असलेल्या विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यासोबत बैठक घेऊन या विमानसेवा लवकरात लवकर सुरु करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री सिंधीया यांनी दिले.

सोलापूर विमातळप्रश्नी सुरु असलेले आंदोलन आणि विमातळाची सद्यस्थितीची माहिती अध्यक्ष गांधी यांनी दिली. त्या वेळी सोलापूर विमानतळावरील अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकारला सूचना दिल्या आहेत. लवकरच तोही विमानतळ सुरु करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान अमरावती, रत्नागिरी या दोन्ही विमानतळाची कामेही गतीने पूर्ण केली जातील. या दोन्ही विमातळावर लवकरच विमानसेवा सुरु केली जाईल, यवतमाळ विमानतळ संबंधातील सद्यस्थितीचा स्वतंत्र अहवाल मागवला जाईल असे त्यांनी सांगितले.

ललित गांधी यांनी राज्यातील सर्व विमानतळांची सद्यस्थिती व अपेक्षित मार्गाचा अहवाल मंत्री सिंधीया यांना देऊन नागपूर, कोल्हापुर, नाशिक, औरंगाबाद विमानतळावरुन विविध नवीन मार्गावरुन सेवा सुरु करण्याची मागणी केली. या विषयी विमान कंपन्यांच्या बरोबर आयोजित बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही सिंधिया यांनी दिली.

यावेळी ललित गांधी, शशांक त्रिवेदी, योगिन गुर्जर, केतन शहा आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.