खुशखबर! आनंदाचा शिधा मिळणार, वाचा मंत्रिमंडळ निर्णय

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि  शिवजयंतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.

वाचा मंत्रिमंडळ निर्णय 

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त  आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ, ५०० ग्रॅम रवा, २५० ग्रॅम डाळ आणि २५० ग्रॅम तेल मिळणार आहे. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर असलेला सत्यशोधक हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे.

राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन निधी मंजूर करण्यात आला आहे. विरार येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी दिली गेली आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान ५० हजारांवरून एक लाखांपर्यंत करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार दिले जाणार आहे. राज्यातील न्यायालयात अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ पदे निर्माण करण्यात येणार आहे. तसेच सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्याबाबत आणि ५८०३ बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.