ग्रंथालय आणि माहितीशास्त्र क्षेत्रातील संधी

0

लोकशाही विशेष लेख

शिक्षण आणि करीयर हे जीवनातील दोन महत्वाचे टप्पे मानले जातात. यामुळे या दोन्हीं पैलूंचा विचार करतांना अनेक बारकावे पाहणे गरजेचे आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात ज्याप्रमाणे तंत्रज्ञानाशी निगडित क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या आणि करियरच्या संधी जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे आज ग्रंथालय आणि माहितीशास्त्र क्षेत्रात देखील अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. मात्र या बद्दल जागरूकता निर्माण करण्यात आलेली नाही किंवा हव्या तितक्या प्रमाणात याबाबत माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जात नाही. आज ग्रंथालय आणि माहिती क्षेत्रात अनेक संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या संधी कोणत्या आणि त्यासाठी कोणत्या शिक्षणक्रमाची गरज भासते या बाबतची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयातील रोजगाराच्या संधी आज आपल्या समोर सादर करतांना आनंद होत आहे. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र हे क्षेत्र पूर्णत: ‘माहिती’ आणि त्यांच्या योग्य संग्रहण, जतन आणि पुर्नप्राप्ती या कार्यावर आधारित आहे. प्राचीन काळापासून ‘माहीती’ ही मनुष्याच्या विकासात प्रमुख भूमिका पार पाडत आली आहे. जीवन जगत असतांना प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या कारणास्तव माहितीची आवश्यकता असते आणि यातूनच माहितीच्या शोधाची गरज भासते. माहितीच्या शोधासाठी अतिशय उपयुक्त असलेले ठिकाण म्हणून ग्रंथालयांकडे पाहिले जातात. ग्रंथालय हे व्यक्तींच्या माहितीच्या गरजा पूर्ण करतात यांत प्रामुख्याने विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, अभ्यासू, जिज्ञासू आणि ज्ञानप्रेमी इत्यादींचा समावेश असतो. या सर्वांच्या गरजा जरी भिन्न असल्या तरी त्यांच्या उपलबद्धतेचे ठिकाण मात्र एकच असते ते म्हणजे “ग्रंथालय आणि माहिती केंद्र होय”.

आधुनिक काळात ग्रंथालयांची भूमिका फक्त ग्रंथाचे देवाण-घेवाण करण्यापुरतीच मर्यादित राहिलेली नसून त्यांचे कार्यक्षेत्र आणि सेवा ह्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. ग्रंथालय हे माहिती केद्रांच्या भूमिकेतून देखील कार्य करत आहे. ग्रंथालयांच्या बदलत्या भूमिकेचा विचार करून नविन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठ ग्रंथालयांच्या नावात बदल करून विद्यापीठ ग्रंथालयांना ज्ञानस्त्रोत केंद्र (Knowledge Resource Center) असे संबोधले जाते तर विद्यापीठाच्या ग्रंथपालांना ‘संचालक’ ज्ञानस्त्रोत केंद्र (Director, Knowledge Resource Center) म्हणून संबोधले गेले आहे.

ग्रंथालय आता केवळ माहिती साधनांच्या देखरेखीसाठी कार्यरत नसून माहितीच्या उपयोगीतेसाठी विविध महत्वाची कार्ये करीत आहे. यांसाठी तंत्रज्ञानाचा वापर सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात ग्रंथालयात होऊ लागला आहे. यामुळे आजच्या युगात ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयात खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी प्राप्त होत असून या रोजगाराच्या संधी फक्त शैक्षणिक किंवा सार्वजनिक ग्रंथालयातच नसून त्या विविध क्षेत्रात उपलब्ध आहे. ग्रंथालय आणि माहितीशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे.

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयाचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या क्षेत्रांमध्ये देखील आपली कारकीर्द घडवू शकतात यांत प्रामुख्याने प्रकाशन संस्था, न्यायालये, आकाशवाणी केंद्र, दूरसंचार केंद्र, ग्रंथालय नेटवर्क संस्था, खाजगी संस्था, शासकीय कार्यालये, रेल्वे, संसद भवन, विधान परिषद, बँक, संशोधन संस्थाने अशा विविध क्षेत्रांचा समावेश होतो. ग्रंथालय आणि माहितीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना संगणक, इंटरनेट, सोशल नेटवर्किंग अशा आधुनिक तंत्राचा वापर करता येणे देखील आवश्यक आहे. ग्रंथालय आणि माहितीकेंद्रात नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग सातत्याने वाढत आहे. संगणकीकरण, डिजीटायझेशन, बारकोडिंग, आर.एफ.आय.डी तंत्रज्ञान, ई-संसाधन व त्यांचे व्यवस्थापन अशा बऱ्याच तंत्रज्ञानाधारित सेवा आणि सुविधांचा देखील अंर्तभाव आता ग्रंथालय आणि माहिती केंद्रात मोठ्या प्रमाणात होत आहे.

ग्रंथपालन शैक्षणिक पदवी आणि पात्रता

महाराष्ट्र शासनाचा ग्रंथालयशास्त्र प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम : इ. १२ वी (कोणत्याही शाखेतून)

बी. लिब आणि आय.एस्सी : पदवी (कुठल्याही शाखेची पदवी)

एम. लिब आणि आय. एस्सी : बि.लिब आणि आय.एस्सी

नेट / सेट : एम.लिब आणि आय.एस्सी

पी. एच. डी (विद्या वाचस्पती) : एम.लिब आणि आय.एस्सी ( विद्या वाचस्पती प्रवेश परीक्षा किंवा नेट/सेट)

एम. फील: एम.लिब आणि आय.एस्सी (मात्र सध्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार वाव नाही)

करीयर घडविण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य

ग्रंथालय आणि माहिती क्षेत्रात कार्यरत असतांना ग्रंथालय व्यवस्थापन आणि संचालन सोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुध्दा महत्वाचा आहे यांत प्रामुख्याने, संगणक हाताळता येणे, विविध संगणकीय प्रणालींचा उपयोग करता येणे इंटरनेट आणि ई-मेल चा वापर करता येणे तसेच सोशल मिडीया आणि सोशल नेटवर्कचा वापर आणि माहिती असणे फार महत्वाचे झाले आहे.
भाषेवर प्रभुत्व ग्रंथालयात विविध भाषेचे साहित्य उपलब्ध असतात तसेच ग्रंथालयात येणारा वाचक देखील विविध भाषिक असू शकतात त्यामुळे स्थानिक भाषे सोबतच राष्ट्रीय भाषा हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असल्यास चांगल्या प्रकारे सेवा देता येते.

कोणत्या पदावर कार्य करता येते

शैक्षणिक, सार्वजनिक आणि विशेष ग्रंथालयात ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक, प्राध्यापक, माहिती शास्त्रज्ञ (शैक्षणिक आणि संशोधन संस्थां), संचालक ज्ञानस्त्रोत केंद्र, संचालक ग्रंथालय संचनालय (महाराष्ट्र राज्य), जिल्हा ग्रंथालय अधिकारी इत्यादी तसेच आपल्या कार्यात सातत्य आणि संशोधन वृत्ती असल्यास एका प्रदीर्घ अनुभव आणि पात्रतेनंतर प्राचार्य, कुलगुरु, कुलसचिव, रजिस्ट्रार अशा महत्वाच्या पदा पर्यंत देखील कार्य करण्याची संधी प्राप्त होवू शकते.

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र रोजगाराच्या संधी

* शैक्षणिक संस्था (शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठे) : बँकिंग क्षेत्र
* केंद्रशासनाचे ग्रंथालय : राष्ट्रीय संग्रहालय आणि अरकाईव्हज
* सामजिक संस्थांमध्ये : रिसर्च आणि डेव्हलपमेंट संस्था उदा. ICAR, CSIR, DRDO, ICSSR, ICHR, ICMR, ICFRE.
* व्यावसायिक क्षेत्र : परराष्ट्र दूतावास आणि उच्च आयोग विभागातील ग्रंथालये
* आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये उदा. WHO, UNESCO, UNO, World Bank etc. : मंत्रालय आणि शासकीय कार्यालयांचे ग्रंथालय
* राष्ट्रीय पातळीवरील दस्तऐवज केंद्रे : ग्रंथालय नेटवर्क संस्थेत उदा. DELNET, INFLIBNET, CLIBNET etc.
* वर्तमान पत्रांच्या ग्रंथालयात : राष्ट्रीय वृत्त वाहिन्यांचे ग्रंथालय
सार्वजनिक आणि संशोधन ग्रंथालय : माहिती पुरविणा-या संस्थ्याम्ध्ये (Database Provider Firms)
प्रकाशन संस्था : देशातील विविध Digital Library Projects” उदा. Digital Library of India
प्रशिक्षण संस्था : केंद्रीय विद्यालये

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध असूनही अद्यापही अनेकांना या विषयी माहित नसल्याचे दिसून येते. म्हणूनच या क्षेत्रातील उपलब्ध संधींचा एक संक्षिप्त आढावा आपल्या समोर मांडण्याचा पयत्न या लेखातून करण्यात आला आहे. ग्रंथालय आणि माहितीशास्त्र हे एक ज्ञानदानाचे पवित्र क्षेत्र असून या क्षेत्रात करियर केल्यास आपण समाजाला विकसित आणि माहिती साक्षर बनविण्यात आपले योगदान देऊ शकतो. परीक्षेच्या निकालानंतर आता पुढे काय…? अशा अवस्थेत असलेल्या सर्व युवा पिढीसाठी मांडलेल्या या लेखात माझ्या परीने नवीन मार्ग सुचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिक्षण आणि करीयर या दोन्हीसाठी प्रयत्नशील असलेल्या सर्व युवा वर्गाला त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

Leave A Reply

Your email address will not be published.