लोकखाद्य : ओला काजू मसाला

0

लोकशाही, विशेष लेख

 

उन्हाळ्याचे दिवस तर आहेतच. भटकंती आणि रानमेव्याचा आस्वाद देखील घेतला असाल, कारण तो वर्षातुन एकदाच मिळतो. गडद रंगांची जांभळं, करवंद, अळू, कोकम, काजू बोंडे सगळं चाखुन चटमट केली असाल. आणि आता साठवण करण्यासाठी तयारी सुरू असेल. रानमेवा चाखाताना ओला काजू तर खालाच असाल, पण तो काही साठवून ठेवता येणार नाही म्हणून जोपर्यंत ओला काजू मिळतो आहे, तोपर्यंत त्याची चव वेगवेगळ्या पद्धतीने घेऊयात.

फक्त याच दिवसात उपलब्ध असणारा ओला काजू हा अनेक खव्वयांना भूरळ पाडतो. खरं सांगायचं तर मांसाहारी पदार्थांपेक्षा देखील ओल्या काजूची भाजी एकदम झकास बनते….पहायची तर मग कशी बनवली ओल्या काजूची भाजी. आज आपण पाहणार आहोत, रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला..

साहित्य:

ओले काजू १ वाटी, ३ कांदे, २ टोमॅटो, १ चमचा आले/लसूण पेस्ट, खडा मसाले- ३/४ लवंगा, १/२ चमचा जिरे,२ तमालपत्र, दालचिनीचा बारीक तुकडा, स्टार फुल, १ ते दिड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, ६/७ तुकडे काजू वाटणासाठी ५ मिनिटं पाण्यात भिजवून ठेवावे, २ चमचे दही, १/१ चमचा जिरे/धने पावडर, ३ चमचे तूप, २ चमचे तेल, ५० ग्रॅम बटर, १ चमचा साखर, चवीनुसार मीठ, २ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर

कृती:

१. ओला काजू स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात टाकून २ ते ३ मिनिटं उकळी द्यावे. नंतर उकळत्या पाण्यातले काजू काढून त्याची सालं काढून घ्यावी.
( जर तुमच्याकडे ओला काजू नसेल तर सुकामेवा मधला काजू गरम पाण्यात १५ ते २० मिनिटं ठेवून द्यावे. व त्या काजूची भाजी सांगितले प्रमाणेच करावी.)
२. आता २ कांदे बारीक चिरून घ्यावेत व १ कांदा पातळ लांबट उभा चिरून घ्यावा. आणि लांबट चिरलेला कांदा तेलात तळून घ्यावा.
३. तळलेला कांदा, टोमॅटो, आणि पाण्यात भिजवून ठेवलेले काजू, १ हिरवी मिरची यांची बारीक पेस्ट करून घ्यावी.
४. आता एका पॅनमध्ये तूप टाकून ओला काजू गुलाबी रंगावर परतून घ्यावा, आणि बाजूला काढून ठेवावा.
५. त्याच पॅनमध्ये तेल टाकून प्रथम फोडणीसाठी जिरे टाकून सर्व खडा मसाला टाकावा. आता बारीक चिरलेला कांदा लालसर रंगावर परतून घ्यावा.
६. कांदा लालसर झाल्यावर आलं/लसूण पेस्ट, आणि कांदा-टोमॅटो-काजू पेस्ट केलेलं वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
७. आता लाल कश्मिरी पावडर, धणे- जीरा पावडर, आणि दही घालून मसाला एकत्र करून परतवून घ्यावे.
८. अर्धी वाटी पाणी घालून ताट झाकून दाटसर ग्रेव्ही छान शिजवून घ्यावी.
९. सर्व मसाले एकजीव झाल्यावर त्यात तळलेले काजू, साखर आणि मीठ चवीनुसार घालून १/२ ग्लास पाणी घालून भाजी दाटसर होईपर्यंत शिजू द्यावी.
१०. काजू मसाला ग्रेव्ही वरतून बटर आणि कोथिंबीर घालून खाण्यासोबत मिक्स डाळीचे वडे किंवा नान द्यावे.

टिप; ओला काजू नसेल तर सुका काजूची भाजी बनवताना सुका काजू रात्री भिजत ठेवला तरी हरकत नाही. ओल्या काजू प्रमाणे लागतो.
२. साखर घातल्याने भाजीची चव अधिक वाढते, ज्यांना साखर नको असेल त्यांनी गुळ वापरावा.

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे
९८९२१३८१३२
पत्रकार/फूड ब्लॉगर

Leave A Reply

Your email address will not be published.