तुम्हाला केसांच्या समस्या उद्भवताय? या गोष्टींचा आहारात करा समावेश

0

लोकशाही विशेष लेख

 

आपल्या आहारावर आपले शरीर स्वास्थ अवलंबून असते. मात्र आजकाल आहाराच्या सवयी बदलल्याने अनेक समस्या निर्माण होतात. यासोबतच केस गळणे आणि अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येने स्त्रियांसह पुरुष देखील त्रासले आहेत. केसांच्या विविध समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक महागडे शॅम्पू आणि तेल वापरताना दिसतात. यामध्ये अनेक हानिकारक केमिकल्स (Harmful chemicals) असल्याने केसांवर वाईट परिणाम होतात. काही जण तर घरगुती उपचार करतात. मात्र केसांना बाह्य पोषण नाही तर शरीरामधून योग्य आहाराच्या साह्याने पोषण मिळणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या आहारात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा, हे आज आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून केस गळती थांबून घनदाट, काळेशार आणि चमकदार होतील.

आवळा

आयुर्वेदानुसार आवळा (Amla) हा अत्यंत बहुगुणी सांगितला आहे. आवळ्यामध्ये विटामिन-सी, फायबर, आयरन, फॉलेट, ओमेगा ३, मॅग्नेशियम आणि कॅलशियम सारखे पोषक तत्व आढळतात. केसांच्या वाढीसाठी विटामिन सी जास्त गरजेचे असते. आवळ्याच्या सेवनाने केस मुळापासून मजबूत होतात. तसेच केस पांढरे होण्याची समस्या दूर होते. आवळ्याचा मुरंबा, चटणी तसेच आवळ्याचे चूर्ण रात्री पाण्यात भिजवून ते सकाळी प्यायल्यास केसांच्या अनेक समस्या सुटतात.

कडीपत्ता

कडीपत्त्यामध्ये (Kadipatta) विटामिन (Vitamins), आयरन आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असल्याने केसांचे आरोग्य चांगलं राहतं. म्हणून रोजच्या जेवणात कडीपत्त्याचा समावेश करावा. तसेच सकाळी काही कडीपत्त्याची पाने चावून खाऊ शकता. तसेच खोबरेल तेल गरम करून त्यात कडीपत्त्याची पाने टाकलेलं तेल देखील तुम्ही केसांना लावू शकतात. यामुळे केसांची चमक वाढते.

शेंगदाणे

शेंगदाण्यामध्ये (Peanuts) विटामिन-बी, मॅग्नेशियम, फालेट यांचं प्रमाण अधिक असल्याने ते केस वाढीसाठी आवश्यक असते. म्हणून रात्रभर भिजवलेले मूठभर शेंगदाणे चावून खाल्याने केस तंदूरुस्त होण्यास मदत होईल.

त्रिफळा

त्रिफळाचे (Triphala) देखील आयुर्वेदात खूप महत्व सांगितले आहे. त्रिफळामध्ये अँटीऑक्सिडन्ट (Antioxidant) घटक असल्याने ते केस वाढीसाठी मदत करतं. मात्र त्रिफळा उष्ण गुणधर्माचं असल्याने योग्य प्रमाणात याचं सेवन करावे

पालक

शरीरात आयरनची कमतरता निर्माण झाल्याने केस गळती होते. मुख्यतः महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान आयरनची कमतरता निर्माण होते, परिणामी केस गळतात. म्हणून आहारात पालकचा समावेश करावा.

आंबट फळे

यासह विविध आंबट फळांचा देखील आहारात समावेश करावा. यात विटामिन-सी भरपूर प्रमाणात असल्याने केसांच्या मुळांना मजबुती मिळते. म्हणून संत्री, मोसंबी, लिंबू यासह किवी, बेरीज आणि पपई ही फळे सुध्दा खायला पाहिजे. जेणेकरून केसांच्या समस्या मुळापासून नष्ट होतील.

 

कविता ठाकरे – चौधरी
९७६५१३६८७५

Leave A Reply

Your email address will not be published.