मानवी देहात प्राण रुपी अदृश्य श्वास फुंकण्याचे काम भगवंत करीत असतो. पहाटे रामप्रहरी लवकर उठल्यावर अंथरुणावरुन अंग सोडण्यापूर्वी दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासतांना “प्रभाते मनी राम चिंतीत जावा”. आपल्या इष्टदेवतांचं स्मरण करतांना हे देवा, परमेश्वरा, पांडूरंगा माझी पहाट आनंदमय, चैतन्यमय होऊ दे… अशी प्रार्थना करुन मगच अंथरुणावरून उठावे.. आपले हात स्वच्छ साबणाने धुवावेत. मग चूळ भरावी, गुळणा कराव्यात. घरात मंगलमय वातावरण होण्यासाठी शक्य असल्यास आकाशवाणीचे प्रसारण रेडिओ लावावा. त्यावर सुंदर भक्तिगीते येतात. सकारात्मक भाव तयार होतात. तोंड धुवून अंघोळ देवपूजा मग जलपान आणि चहा कॉफी असा परिपाठ पहाटे ज्यांचा असतो; त्यांचा दिवस चांगला गेला असं समजायला काही हरकत नाही.
पहाटे वातावरणात शुद्ध ‘ओझोन’ वायु असतो. तो आरोग्यासाठी उत्तम असतो. म्हणून भ्रंमंती, व्यायाम, योगासने ही सुर्योदयाआधी झाली तर शरीरातले त्रिदोष नाहीसे होतात. वात-पित्त कफ हे त्रिदोष वाढले की शरीर स्वास्थ बिघडते त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेऊन आहार विहाराचे नियोजन करायला हवे.
सातपुडयाच्या काठाशी माझं गांव, भरपूर शुद्ध हवा, पाणी, बागायती क्षेत्र, कापुस, केळी, ज्वारी, बाजरी, मका आधुनिक शेतीतून उन्हाळयात कलींगड, खरबूज, कारली, टोमॅटो रब्बी हंगामात दादर, गहू, हरबरा, हळद, अद्रक, मिरची पिकवणारा इथला शेतकरी श्रमदेवतेची कास धरुन समृध्दपणे जीवन जगतोय. मी रेडिओ श्रोता आहे. त्यामुळे जीवन जगतांना सदैव ‘आलीया भोगासी असावे सादर’ या अभंगानुरुप सकारात्मक विचारांचा मागोवा घेत भक्तिगीतांचा आस्वाद व गोडी चाखतांना काही निवडक भक्तिगीतं मला आवडतात. त्यात पं. भिमसेन जोशी, मोहंमद रफी, लता मंगेशकर यांच्या तसेच श्रीधर फडके, जयवंत कुलकर्णी, अर्चना जोगळेकर, आशा भोसले, नरेंंद्र चंचल यांच्या भक्तिगीतांमुळे पहाटेची वेळ कशी निघून जाते हे कळत नाही. एखादं भक्तिगीत मात्र मनावर गारुड करुन जातं:- “प्रभु तू दयाळू कृपावंत दाता, दया मागितो रे तुझी मी अनंता” हे ऐकतांना मन भगवंताच्या चरणकमलांवर रुंजी घालू लागते..! सकारात्मक जीवन शैलीतून मनाला व्यायाम देता येऊ शकतो. त्यामुळे चेहऱ्यावर तेज अधिक खुलुन दिसते. पहाटेचे नित्य परिपाठ ज्यांचे चांगले त्यांनाच दिवस आनंदात प्रसन्नतेत गेल्याचं समाधान लाभते. पहाटेचा रुद्र मंदिरात घंटानाद करतो, चिंतन ध्यान धारणेसाठी पहाटेची वेळ चांगली..!
सर्व साक्षी श्याम माझा रहतो हृदयांतरी ।
नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी ॥
भगवंत प्रत्येकाच्या हृदयात असतो, नव्हे राहतो, नांदतो म्हणून तो श्रीहरी. गोपाळकृष्ण आहे. पहाटेच्या कोवळया सूर्यकिरणांच्या साक्षीने तो मानवाला नवचैतन्य प्रदान करतो. संपूर्ण विश्वातलं जनजिवन त्याचे आचार विचार व्यवहार या सर्वांचा तो साक्षीदार आहे. पंचमहाभूतांच्या माध्यमातून अखिल ब्रम्हांडात कुठे वादळवारा, कुठे कडक उन्हाळा, कुठे पाऊस गारा, आगीचे प्रचंड अक्राळ-विक्राळ स्वरुप तर कुठे धरणीकंप या सर्व घटनांचा तो साक्षीदार आहे म्हणून तो हरी भक्तांच्या अंतरंगात राहतो. संतानी त्याला प्रकृतीपुरुष हे नाव दिले आहे आणि ते त्याला सार्थक आहे.
तान्हुल्या बिंदुपरी राहतो संताघरी ।
नाम त्याचे श्रीहरी रे नाम त्याचे श्रीहरी ॥
भगवंताच्या भक्तिचं वर्णन एखाद्या गीतातून होऊच शकत नाही ? त्याचा महिमा अवर्नणीय अगाध असाच आहे. परंतू अनेक संत, महंत, कवी यांनी मोजक्या शब्दांत त्याला बांधण्याचा प्रयत्न केला आहे. मनाचे कान व हृदयाचे डोळे केल्याशिवाय भगवंत कळू शकणार नाही असा तो अनंतकोटी ब्रम्हांडनायक आहे. संत परमहंसाच्या घरी लहान सुक्ष्म जीवाप्रमाणे राहतो तो भगवंत दयाळू कृपावंत आहे. मेघ:श्यामवर्ण कोमल आणि त्यातही सुक्ष्म असा असूनही तो पुन्हा विश्वंभर आहे. भगवंताच्या स्वरुपाचं वर्णन साग्रसंगित ऐकायला पहाटे मात्र लवकर उठावे लागते त्यासाठी एकाग्रचित्ताने हे भजन ऐकून घेतलं तर मन, चित्त,बुध्दी शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. बासुरीच्या सप्तसुरांनी पहाट आनंददायी चैतन्यमय होईल यात शंकाच नाही…!
रमेश जे. पाटील
आडगाव ता. चोपडा
9850986100