आ. चंद्रकांत पाटलांची अभिनंदनीय कृती

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

भुसावळ नागपूर रेल्वे मार्गावरील बोदवड रेल्वे स्थानकावर बांधण्यात आलेला रेल्वे फ्लाय ओवर ब्रिज गेल्या तीन-चार महिन्यापासून बांधून पूर्ण तयार होता.  परंतु उद्घाटन सोहळ्याच्या प्रतीक्षेत वाहनधारकांना तो खुला केला जात नव्हता. केंद्र शासनातर्फे बांधण्यात आलेल्या हा ओवर ब्रिज वाहनधारकांच्या सोयीसाठी बांधण्यात आला असला तरी संपूर्ण ब्रिज बांधून तयार असताना उद्घाटन सोहळ्यासाठी गेल्या तीन-चार महिन्यापासून खुला न करणे म्हणजे कुंभकर्णी प्रशासनाचा अजब नमुना म्हणता येईल. प्रवाशांच्या सोयीसाठी बांधलेला पूल पूर्णपणे बांधून तयार असताना प्रवाशांची होणाऱ्या गैरसोयकडे पाहत राहणे हा अजब प्रकार म्हणता येईल. सदर ओवर ब्रिज तयार झाल्यापासून मुक्ताईनगर बोदवडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना दोन-तीन वेळा पत्राद्वारे पूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली. सदर पूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर प्रशासनाच्या तसेच संबंधित लोकप्रतिनिधींच्या सोयीनुसार त्याचा उद्घाटन सोहळा करावा, अशी विनंती आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली. तथापि आमदारांच्या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आली. बुधवार दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिनी पावरा संघटना तसेच अपंग संघटना यांच्या वतीने बोदवडला सेवाग्राम एक्सप्रेसचा थांबा मिळावा या मागणीसाठी रास्ता रोको आणि रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वतः आमदार चंद्रकांत पाटील हेही सहभागी झाले होते. त्यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लवकरच सेवाग्राम एक्सप्रेस चा थांबा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील आणि मोर्चेकरांनी बोदवड रेल्वे स्थानकावरील ओवर ब्रिजकडे आपला मोर्चा वळविला आणि उपस्थित जनसमुदायाच्या उपस्थितीत रेल्वे ओवर ब्रिजवर बॅरिगेट टाकून वाहतुकीसाठी बंद केलेला ओवर ब्रिजवरील दोन्ही बाजूचे बॅरिगेट्स जेसीबीच्या साह्याने काढून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासन आणि आमदार यांच्यात शाब्दिक चकमक होऊन झटापट झाली. परंतु ओवर ब्रिज तयार करताना तो वाहतुकीसाठी खुला करून प्रवाशांची गैरसो टाळावी या मागणीला आमदार चंद्रकांत पाटील ठाम होते. अखेर तो खुला करण्यात आला. परंतु त्यानंतर पुन्हा काही काळासाठी बंद करण्यात आला. परंतु आमदार चंद्रकांत पाटील यांच्या रुद्र अवतारा नंतर अखेर तो रेल्वे ओवर ब्रिज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आमदार चंद्रकांत पाटलांनी जनतेच्या सोयीसाठी जी कृती केली, जे पाऊल उचलले त्याबद्दल आमदार चंद्रकांत पाटलांचे अभिनंदन केले पाहिजे. त्यांना जनतेकडून धन्यवाद दिला पाहिजे..

 

जनतेच्या सोयींसाठी शासनातर्फे जे काही प्रकल्प तयार केले जातात त्याचा वेळीच फायदा जनतेला व्हावा, ही त्या मागची अपेक्षा असते. परंतु आमचे शासन आणि प्रशासनाकडून त्याचे गांभीर्य लक्षात घेतले जात नाही. शेवटी त्या त्या भागातील जनता आपल्या लोकप्रतिनिधींकडे आपले घराणे मांडतात. त्या कारणाची दखल लोकप्रतिनिधींकडून घेतली गेली नाही तर अशा लोकप्रतिनिधींना त्यांच्याकडे मत मागण्याचा अधिकार राहील का? म्हणून कुंभकर्ण प्रशासनाला आमदार चंद्रकांत पाटलांनी आपल्या कृतीतून जागे केले हे योग्यच केले. राजकारणात श्रेयवाद घेण्यासाठी चढाओढ लागलेलीच असते. जे कोणी लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्यांकडून उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी सदर ओवर ब्रिज वाहतुकीसाठी खुला न करता पूल तयार झाला असताना जनतेची गैरसोय करायची हा काय प्रकार म्हणावा? वाहतुकीस पूल खुला करून त्याचे उद्घाटन त्यांच्या सोयीनुसार करू शकतात. बरे फुल हा वाहतुकीसाठी खुला करण्यास काही तांत्रिक अडचणी असतील तर त्याला विलंब करणे हे आम्ही समजू शकतो. तीन-चार महिन्यापासून सदर ओवर ब्रिज तयार असताना त्यावरून वाहतूक न होण्याने रेल्वे फाटक बंदचा फटका प्रवाशांना बसतो, त्याचे काय? मुक्ताईनगर आणि बोदवडला जोडणारा हा ओव्हर ब्रिज असल्यामुळे अनेकांना जावे यावे लागते. त्यात कुणी आजारी व्यक्ती असली तर त्याला ताटकळत थांबावे लागते. त्या आजारी व्यक्तीला होणाऱ्या त्रासाची दखल कोण घेणार? आमदार चंद्रकांत पाटील हे सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना तसेच केंद्रातही त्यांचे सरकार असताना त्यांनी हा आतताई पणा करायला नको होता, अशी मखलाशी त्यांचे विरोधक करतील. तथापि आमदार चंद्रकांत पाटलांनी दोन-तीन वेळा संबंधित यंत्रनेशी पत्रव्यवहार करून त्यांची दखल घेतली नाही. तर जनतेच्या हितासाठी त्यांनी जे पाऊल उचलले ते अभिनंदनीयच पाऊल होय…!

Leave A Reply

Your email address will not be published.