खेडीच्या विकासाकडे दुर्लक्ष : महापौरांची कबुली

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव महानगरपालिकेतील लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाल 40 दिवसानंतर संपणार आहे. त्यानंतर प्रशासकांच्या हाती महापालिकेच्या कारभार राहील. 40 दिवसांच्या या कालावधीत आपापल्या प्रभागातील विकास कामे उरकून घेण्यासाठी जणू चढाओढ लागली आहे. त्यामुळे सर्वच पक्षाचे नगरसेवक हातघाईवर आलेले आहेत. राजकारणाच्या या साठमारीत अनेक विभागात विकासाची कामे रखडलेली आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून महामार्गावरील महामार्गालगत असलेल्या खेडी बुद्रुक मध्ये रस्ते चिखलाने भरलेले असताना मुरुम रोडावरून वाहन चालवताना कसरत होत असल्याने या प्रभागाचे नगरसेवक प्रवीण कोल्हे यांच्याकडे खेडीवासीयांनी मुख्य रस्त्यावर मुरूम टाकण्याची विनंती केली. स्वतः नगरसेवक प्रवीण कोल्हे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत खेडीत पोहोचले. पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तोपर्यंत मुरूम टाकून रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्याचे मान्य केले. पंधरा दिवस झाले तरी मुरूम टाकला गेला नाही. नगरसेवक प्रवीण कोल्हे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून मुरूम का टाकला नाही, अशी तक्रार केली. तेव्हा पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्टर उपलब्ध नसल्याचे सांगितले गेले. त्यानंतर टाकण्यात येणारा मुरूम योग्य नव्हता म्हणून टाकला गेला नाही, असे त्यांनी प्रांजळपणे मान्य केले. खेडी गाव नगरपालिका आणि त्यानंतर महापालिकेच्या अखत्यारीत आल्यापासून खेडीत कसलाच विकास झालेला नाही. बिचारे खेडीवासीय असंख्य वेळा तक्रारी करून थकले. महापालिकेत चकरा मारल्या, पण त्यांची कुणीही दखल घेतली नाही. जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे दोन वेळा आमदार झाले, परंतु त्यांनीही खेडी हा भाग आपल्या मतदार संघात आहे हे जणू विसरूनच गेले. त्यांच्याकडे खेडीवासीयांनी निवेदन दिले तेव्हा कुठे खेडीच्या मुख्य रोड ज्याला डीपी रोड म्हणतात तो रोड आमदारांच्या निधीतून करण्याचे आश्वासन दिले. तथापि प्रत्यक्षात या रोडचे काम सुरू होईल तो दिवस खेडी वासियांसाठी सुदिन म्हणता येईल. कारण आता पावसाळ्याचे कारण पुढे केले जात आहे. महापौर उपमहापौर यांच्यावर संपूर्ण शहराची जबाबदारी असते. शहरातील एका भागाचा विकास आणि दुसरा भाग भकास, असा दुजाभाव करून चालत नाही. परंतु तसेच होत असताना जळगाव शहरात मात्र दिसते आहे. जळगाव महापालिकेतील कारभाराबाबतचे विश्लेषण करायचे झाले तर ‘जिसकी लाठी उसकी भैस’ या म्हणीप्रमाणे करता येईल. नगरपालिकेत जो नगरसेवक वजनदार आहे, त्याच्या प्रभागातील कामे अग्रेसर पद्धतीने होतात. जे नगरसेवक स्वभावाने शांत आहेत, अथवा त्यांच्या पाठीमागे पक्षाची ताकद नाही, त्या नगरसेवकांच्या प्रभागात विकास कामांची बोंबाबोंब आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. खेडीच्या संदर्भात दुजाभावाची दिली गेली आहे. गेल्या 30-35 वर्षाच्या कालावधीत खेडी मध्ये रस्ते नाही, गटारी नाही, स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. म्हणजे खेडी गावात ग्रामपंचायतीमार्फत खेडीचा झालेला विकास पाहिला की खेडीवासीयस ग्रामपंचायत असताना ज्या सुख सोयी मिळत होत्या त्याला अक्षरशः पारखे झालेले आहेत.

जळगाव महानगरपालिकेच्या महापौर सौ. जयश्री महाजन यांनी जळगाव शहराच्या विकासासंदर्भात एक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना खेडीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याची कबुली दिली. आता 40 दिवसांचा त्यांचा कार्यकाळ राहिला असल्याने जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी ही कबुली दिली असली तरी गेल्या अडीच वर्षाच्या आपल्या महापौराच्या महापौर पदाच्या किर्दीत त्या फिरकल्या सुद्धा नाहीत, हे त्यांना विसरता येणार नाही. महापौर सौ. जयश्री महाजन या सुशिक्षित असून जनतेच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. परंतु राजकारणामुळे त्यांना मर्यादा आल्या आहेत, तेही तितकेच खरे. परंतु त्यांची काम करण्याची तळमळ प्रामाणिक असली तरी, जनतेची कामे झाली नाहीत, हे मात्र मान्य करावे लागेल. आता खेडीकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाले म्हणणाऱ्या महापौर जयश्री महाजनांनी एकदाही खेडीकडे फिरकल्या नाहीत. आता महापालिकेवर प्रशासक राजवट येईल. त्यानंतर सर्व नगरसेवक हतबल होतील. प्रशासक म्हणजे पर्यायाने आयुक्तांच्या हाती संपूर्ण कारभार राहील. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसल्याने प्रभागात विकासाची कामे होत नाहीत, असा आरोप आता प्रशासकीय राजवटीत आयुक्तांना तो पुसून काढावा लागणार आहे. महापालिका आयुक्त सौ. विद्या गायकवाड कार्यालयात बसूनच सर्व कारभार करतात, त्यांचे संबंधितांशी लागेबांधे आहेत, आदी आरोप करून त्यांच्यावर नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणला होता. राजकारणामुळे हा विश्वास ठराव बारगळला आहे. आता प्रशासकीय राजवटीत आयुक्त विद्या गायकवाड यांना आपल्या कामातून आपली कार्यक्षमता सिद्ध करावी लागणार आहे. अविश्वास ठराव बारगळल्या पासून आयुक्तांनी आपल्या कामाचा सपाटा सुरू केला आहे. ही चांगली बाब म्हणता येईल महापालिकेच्या लोकनियुक्त प्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर महापालिकेची निवडणूक होणे अनिश्चित आहे. त्यासाठी प्रशासकीय राजवटीचा अनुभव आता जळगावकरांना येणार आहे. त्यासाठी प्रलंबित विकास कामे आणि पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे पूर्ण करून जळगावकरांची मने जिंकली पाहिजेत. अमृत योजनेच्या रेंगाळलेल्या कामाला गती देऊन संपूर्ण जळगावकरांना अमृतचे पाणी निश्चित मिळण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे…!

Leave A Reply

Your email address will not be published.