राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या नावांची चाचपणी होणार

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

अमळनेर येथे शुक्रवार दिनांक १६ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेलतर्फे राज्य अधिवेशन होत आहे. त्याच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे अमळनेर येथे येत आहेत. या उद्घाटन सोहळ्या बरोबरच हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार कोण असतील? त्याबाबत चर्चा करण्याची दाट शक्यता आहे. जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस मतदार संघ असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. या दोन्ही लोकसभा मतदारसंघात यंदा निवडून येणारे उमेदवार देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी परंपरेने मराठा उमेदवार दिला जातो. २०१९ च्या निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकरांची निवडणुकीची तयारी नसताना त्यांच्यावर उमेदवारी लादली गेली. त्यामुळे जळगाव मतदार संघाला परवा पराभवाला सामोरे जावे लागले. तथापि यंदा निवडून येणारा उमेदवार देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने व्यूहरचना केलेली आहे. त्यात महाविकास आघाडीची युती कायम राहिली तर जळगाव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकतो.  त्यासाठी अंमळनेरचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद असलेले अनिल भाईदास पाटील यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याचे कळते. आमदार अनिल भाईदास पाटील यांची आमदारकीची कारकीर्द लक्षवेधी ठरली आहे. तालुकाच नव्हे तर जळगाव, धुळे जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या पाडळसे धरणाच्या पूर्णत्वासाठी आदिल भाईदास पाटील यांचा पाठपुरावा कौतुकास्पद आहे. तालुक्यातील विकासाच्या प्रश्नासाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी आहे. अंमळनेर येथील विभागीय कार्यालयाच्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी धक्का तंत्र आंदोलन केले आणि कार्यालयासाठी जागा पदरात पाडून घेतली. एकंदरीत तरुण, तडफदार आमदार अनिल भाईदास पाटील यांचे नाव जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून आतापासूनच कामाला लागण्याच्या सूचना त्यांना देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघासाठी परंपरेने लेवा पाटील समाजाचा उमेदवार दिला जातो. या मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे दोन वेळा निवडून आल्या आहेत. २०१४  आणि २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी त्यांचे सासरे माजी मंत्री एकनाथ खडसे हे भाजपात वजनदार नेते होते. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून ते गेल्या ३०  वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे रावेर मतदार संघात समावेश असलेल्या मलकापूर आणि नांदुरा या विभागातील दोन तालुक्यात त्यांचे चांगले संबंध होते. चोपडा, यावल, रावेर तालुक्याशी त्यांची नेहमी जवळीक राहिली आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना निवडणुकीत विजय मिळविणे सोपे झाले होते. तथापि निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांना विधान परिषदेची आमदारकीही दिली गेली. आता त्यांच्या भाजप घरवापसीच्या चर्चा सुरू असताना “भाजपात पुन्हा प्रवेश करणे कदापि शक्य नाही..” अशी स्पष्टोक्ती देऊन “ आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार” असल्याचे खडसेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे यंदाच्या म्हणजे आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रावेर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून एकनाथ खडसे यांच्या नावाला पहिली पसंती राहील, यात शंका नाही. लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन जागांबरोबर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या युतीनुसार ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची चर्चा सुद्धा या तिन्ही दिग्गज नेत्यांकडून करण्याची शक्यता आहे. त्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसेच आतापासूनच देवकरांना कामाला लागण्याची सूचना देखील दिल्याचे कळते. जिल्ह्यातील पारोळा एरंडोल मतदारसंघात माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या नावाची निश्चिती करण्यात येईल, असे वाटते. भडगाव पारोळा मध्ये महाविकास आघाडी युतीतर्फे जागा राष्ट्रवादीला मिळाली तर, माजी आमदार दिलीप वाघ यांच्या नावाबाबत चर्चा होऊ शकते. अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांचे नाव जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी निश्चित झाले तर अमळनेर विधानसभेसाठी अनिल भाईदास पाटील यांच्याकडून जे नाव सुचवले जाईल त्या नावाला पक्षश्रेष्ठी मान्यता देतील. आमदार अनिल भाईदास पाटील यांचेकडून कृषी भूषण साहेबराव पाटील यांचे नाव सुचवले जाऊ शकते. पाहूया काय होते… हा एक अंदाज आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.