जळगावात 2191 कर्मचाऱ्यांनी घेतले लोकसभा निवडणुकीचे प्रशिक्षण…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान अधिकारी, इतर मतदान अधिकारी यांच्या मतदान विषयक प्रथम प्रशिक्षणाचे शनिवार दिनांक 6 एप्रिल रोजी शहरातील संभाजी राजे नाट्यगृहात आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण क्षेत्रात जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील एकूण 2191 कर्मचारी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये घेण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे ठरवून देण्यात आलेल्या सात मुद्द्यांच्या आधारे मतदान यंत्रे ताब्यात घेण्यापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंतची प्रक्रिया, मतदान केंद्रावर नियुक्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडावयाची कामे, मतदान प्रक्रियेतील अडीअडचणी, व पारदर्शक मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या या प्रशिक्षणात प्रथम टप्प्यात मतदान अधिकारी व सहाय्यक मतदान अधिकारी यांचे तर दुसऱ्या टप्प्यात इतर मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. शनिवारी आयोजित दोन्ही टप्प्यातील प्रशिक्षणाला जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील एकूण 2191 कर्मचारी हजर होते. हे प्रशिक्षण जळगाव विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर, तहसीलदार शितल राजपूत, जळगाव शहर महानगरपालिकेच्या सहआयुक्त निर्मला गायकवाड, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडले. यावेळी नायब तहसीलदार राहुल वाघ, श्री.चंदनकर यांनी मदत केली.प्रशिक्षणाला अनुपस्थित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या आहेत. अशी माहिती जळगाव शहराच्या तहसीलदार शितल राजपूत यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.