जैन आहार पद्धती सर्वात शुद्ध..!

0

प्रवचन सारांश  –  दि.  11 ऑगस्ट 2022

‘आगाम गाथा’ प्रवचन श्रृंखलेत पू. जयधुरंधर मुनी यांनी प्रवचनात सांगितले की, ‘जसा आहार तसे मन’  बनते जैनांच्या आहार पद्धतीमध्ये शुद्धता असते, त्याबाबत अनेकांनी संशोधन केलेले आहे. असे असले तरी दुर्दैवाने आज असे दिसते की, जैन व्यक्ती जणू आपली मूळ आहार पद्धती  विसरत आहे की काय असे वाटायला लागते. आहार विवेक न ठेवल्यामुळे आपले आरोग्य बिघडते. आहार विवेकाविषयी आपल्या प्रवचनात पूज्य मुनींनी विश्लेषण केले. आपले पोट हे कचरापेटी नव्हे. सात्विक आहार आपण सर्वांनी करायला हवा.

मद्य, मांस इत्यादी वर्ज्य करायला हवे. काय खावे? आणि काय खाऊ नये? केव्हा, किती खावे? याबाबत आगम शास्त्रामध्ये उत्तम असे मार्गदर्शन करण्यात आले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, दुधाची खीर खाल्ली आणि त्यावर लिंबूशिखंजी प्याले तर त्याचा पोटात काय दुष्परिणाम होतो हे तुम्हा आम्हा सर्वांना चांगले ठाऊक आहे. खरे तर उणोदरीव्रत म्हणजे जेवढा आपला आहार त्यापेक्षा कमी.. पूर्ण पोट भरणार नाही पोट थोडे रिकामे असेल असा आहार आपण घेणे गरजेचे आहे. ‘आहार’ आणि ‘आरोग्य’ यांचा अगदी जवळचा संबंध आहे. आहार देखील विवेकानेच घ्यायला हवा असे आवाहन आजच्या प्रवचनातून करण्यात आले.

जळगाव येथील स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती  12 वे पट्टधर आचार्यश्री पु. पार्श्वचंद्रजी म. सा. आदीठाणा 7 यांच्या पवित्र सानिध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे.

‘जन’, ‘जैन’ आणि ‘जीन’ अशी क्रमशः परिवर्तन करण्याची शक्ती जीनवाणीमध्ये असते. जैन कुलात जन्म घेतला परंतु जैनत्व चर्या नसेल तर त्याचा काय उपयोग? उच्च कुलात जन्म घेतला परंतु त्याच्यात त्या कुलाचे गुणधर्म नसतील तर तो निंदेस पात्र ठरतो. उदाहरण म्हणजे एखाद्या सोन्याच्या कलशामध्ये मद्य भरलेले असेल तर तो सोन्याचा कलश असला तरी त्यात मद्य भरल्यामुळे तो निंदेस पात्र ठरतो. जैनची ओळख बाह्य लक्षणांनी न होता त्याच्या ‘आचार’ ‘विचारां’नी त्याची खरी ओळख होत असते. जैनची ओळख ‘चित्र’ ने नव्हे तर ‘चरित्रा’ने होते. 32 आगम गाथामध्ये ‘आचार’ याला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे. याबाबत ‘मेरी भावना’ प्रवचन मालेत सांगण्यात आले. डॉ पदमचंद्रमुनी यांचे सुशिष्य पूज्य जयपुरंदर मुनी यांनी प्रवचन केले.

एका जैनाने चूक केली तर त्याचे अनुकरण इतर दुसरे करत असतात. जैन लग्न कार्यामध्ये कंदवर्गीय भाज्या नसाव्यात परंतु अलीकडे त्या दिसतात आपली श्रीमंती, वैभव दाखविण्यासाठी 50 पेक्षा अधिक खाद्यपदार्थांची थाळी लग्नात असते.  परिस्थितीने गरीब जैन व्यक्तीला समाजात राहण्यासाठी 50 खाद्यपदार्थांची थाळी लग्नात  द्यावी लागते. ते करायची त्याची परिस्थिती नसते. ते  करण्यात त्याच्या संपूर्ण आयुष्याची कमाई खर्च होते, असे होऊ नये. हा देखील  विवेक बाळगला पाहिजे असे स्पष्ट पणे प्रवचनातून सांगण्यात आले. जैनाने ‘आचार’ ‘विचार’ आणि ‘द्रव्य’ शुद्धी ठेवली पाहिजे असे आवाहन देखील करण्यात आले. 12 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन विषयक विशेष प्रवचन होणार आहे. श्रावक-श्राविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन देखील करण्यात आले.

—– ¤¤——

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.