भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणजे ‘भाऊबीज!’

0

प्रवचन सारांश – 27 ऑक्टोबर 2022 

भाऊ-बहिणीचे प्रेम व त्याचे प्रतीक म्हणजे ‘भाऊबीज’ होय. भगवान महावीर स्वामी यांच्या काळापासून भाऊ-बहिणीच्या प्रेमाची सुरू असलेली ही परंपरा आजही अखंडपणे चालत आहे असे पू. जयपुरंदर मुनी यांनी प्रवचनात सांगितले.

देवलोकात देखील सुख-दुःख ह्या भावना असतात असे आगमशास्त्रात नमूद आहे. संसारातील देव, मनुष्य, तिरंछ आणि नरक गती अशा चार गतींमध्ये देखील सुख-दुःख असतेच. नेहमी सुखाची अवस्था राहील अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे. असे सांगून ते स्पष्ट करण्यासाठी गायी व त्यांचे पालन करणाऱ्याची रुपक कथा प्रस्तुत केली. आपल्या गायींबद्दल निस्सीम प्रेम असलेल्या गोपालक सर्व गायी खाऊन तृप्त होत नाही तो पर्यंत तो स्वतः जेवण घेत नसे. एकदा मात्र घडले वेगळेच, दुपार झाली तरी देखील एक गाय मात्र उभीच होती. ती उभी असणे म्हणजे तिचे पोट भरले नाही असे प्रतिकात्मक म्हणता येईल. त्या गायीजवळ गेल्यावर गायीचे पोट भरले आहे असे त्याच्या निदर्शनास आले. तिला बसविण्याचा प्रयत्न करतो तरी ती गाय बसत नाही. एक दांडा घेऊन तो गायीला बसविण्याचा घाट घालतो उलट दांडू पाहून इतर बसलेल्या गायी उठलेल्या असतात. त्या दिवशी तो आपला पण पूर्ण करू शकत नाही. म्हणजे एक सारखी परिस्थिती नसतेच. कोणतीही परिस्थिती येवो आपण डगमगू नये असा संदेश मेरी भावना या रचनेत दिलेला आहे. सुख-दुःखाचे देखील हे असेच असते. सुख- दुःख आपल्याच कर्मामुळे येत असतात. सुखात अहंकार आणि दुःखात घाबरणार नाही हा मोलाचा विचार आजच्या प्रवचनाच्या माध्यमातून देण्यात आला.

जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्य श्री पार्श्वचंद्र जी म.सा., डॉ. पदमचंद्र म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात जळगाव येथील स्वाध्याय भवनात चातुर्मास सुरू आहे. त्यात डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर म.सा. यांची ‘मेरी भावना’ प्रवचन माला सुरू आहे. आपण खूप दुःखी आहोत असे आपल्याला वाटत असेल तर आपल्यापेक्षा दुःखी व्यक्तींकडे आपण पाहिले पाहिजे. एक मात्र खरे की जीवनात कधी कधी दुःख येणे पण आवश्यक असते. दुःखात सकारात्मक विचार, चिंतन करायची संधी तर आपल्याला मिळते. नेहमी सकारात्मक विचार करत रहावा या बाबत राजा अकबर व बिरबल यांची एक कथा सांगितली गेली. ‘जो होता है वो अच्छे के लिये होता है।’ हे सांगण्यात आले.

संसारात वियोग-संयोग अशा परिस्थितीतून जावेच लागते. जीवनात दुःख येण्याचे कारण समजले तर बरे असते. दुःखात शोक नव्हे तर शोध करावा. भाऊबिजेच्या पर्वाबाबत देखील पू. जयपुरंदर म.सा. यांनी सांगितले. दिवाळीच्या दिवसांमध्ये भगवान महावीर स्वामी यांचे निर्वाण झाले त्यावेळी त्यांचे संसारी बंधु नंदीवर्धन यांनी अतिशोक केला. त्यांना समजावण्याचे काम त्यांची मोठी बहिण सुज्येष्ठा ह्यांनी केले. भाऊ बिजेच्या दिवशी बहिण सुजेष्ठा यांनी आपल्या भावाला घरी बोलाविले व समजावून सांगितले. भाऊबिजेची ही परंपरा आज देखील सुरू आहे. भारतीय संस्कृतिमध्ये भाऊ बहिणीच्या रक्षाबंधन व भाऊबीजेच्या सणांना त्यामुळेच महत्त्व देण्यात आलेले आहे असे सांगितले.

27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान आर.सी. बाफना स्वाध्याय भवन येथे सकाळी 7 ते 8 दरम्यान अनुप्पेहा ध्यान शिबीर आयोजण्यात आले आहे. आज त्याचे औपचारिक उद्घाटन झाले. या शिबिराच्या आरंभात 200 साधकांनी आपला सहभाग नोंदविला. या शिबिराचा श्रावक-श्राविकांनी देखील लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.