रक्षाबंधन अलौकिक सण – पू. जयपुरंदर मुनी

0

प्रवचन सारांश – 12/08/2022

आज प्रत्येक क्षेत्रात अबाल-वृद्ध, स्त्री-पुरुष यांना असुरक्षा वाटू लागली आहे. आजची परिस्थितीच अशीच आहे. ‘आत्मा’ व ‘शरीर’ या दोघांची रक्षा होणे प्रत्येक जीवास वाटते. शरीराचे रक्षण तर करता येते. परंतु, अजरामर, अविनाशी आत्मा आहे तर त्याची रक्षा कशी करावी ? हा मूळ प्रश्न आहे. धर्मामुळे आत्म्याचे रक्षण होते असे आगम शास्त्रात सांगितलेले आहे. आगम शास्त्रात सांगितलेले जर तंतोतंत पालन केले तर आत्म्याचे संरक्षण होते. जो धर्माची रक्षा करतो, त्याची रक्षा धर्म करतो. जैन धर्म इतिहासात डोकावून पाहिले असता अनेक अत्याचार झालेले आहेत. साधू संतांचे जीवन संरक्षित करणारी अशीच एक घटना श्रावण पौर्णिमेच्या दिवशी घडली. त्याबाबत प्रवचनात विवेचन करण्यात आले. मुनी विष्णू कुमार यांनी साधू संतांचे जीवन, धर्म हे संरक्षित केले. याबाबत जयगच्छीय 10 वे पट्टधर पूज्य लालचंदजी महाराज साहेब यांनी काव्य रचले आहे. त्या काव्याचा आणि रक्षाबंधनाचा काय संबंध आहे ? या पर्वाची काय महती आहे ?  विष्णू कुमार व नमोची यांच्या रूपक कथेत सांगण्यात आले.

“इन भरत क्षेत्र में धर्म रक्षा की विष्णू कुमारने..” हे काव्य त्यांनी सुमधुर आवाजात सादर केले. त्या सोबतच त्याचे स्पष्टीकरण देखील अत्यंत सोप्या पद्धतीने उपस्थित श्रावक-श्राविकांना समजावून सांगितले. डॉ. पदमचंद्रमुनी यांचे सुशिष्य पु. जयपुरंदर मुनी यांनी ‘रक्षाबंधन’ या विषयावर  प्रवचन केले. जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यश्री पुज्य पार्श्वचंद्रजी म. सा. आदीठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात जळगाव येथील स्वाध्याय भवन येथे चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे.

रुपक कथा कथन करताना म्हणाले की, हस्तीनापूरचे सम्राट राजा पदमोत्तर यांचे सुपुत्र जे पुढे चक्रवर्ती झाले ते महापद्म आणि मंत्री असलेले नमोची ह्यांच्याबद्दल सांगितले. आचार्य श्री सुव्रताचार्य यांचा चातुर्मास कार्यक्रम हस्तीनापुर येथे होता. त्यादरम्यान पूर्वी कधी मागितलेले वचन नमोचिने राजा महापद्म यांच्याकडे मागितले. त्याने असे मागितले की, ‘मला सात दिवसांसाठी चक्रवर्ती राजा म्हणून संधी द्या !’ त्या 7 दिवसांमध्ये नमुची यांनी जैन मुनींवर त्याच्या मनात असलेल्या रागामुळे एक राजहुकूम जारी केला की ‘सात दिवसाच्या आत जैन साधु-संत त्यांच्या शासन क्षेत्रात जर राहिले तर त्यांना घाणीमध्ये पिळून मारून टाकले जाईल…’ या आदेशामुळे  सर्वच चिंतित झाले. कारण 6 खंड यावर राजाची सत्ता होती जाणार तर कुठे जाणार ? सात दिवसांपुरता चक्रवर्ती झालेला हा नमुची याने राज फर्मान रूपी काढलेल्या या संकटातून केवळ विष्णू मुनी सोडवू शकतील, संरक्षित  करू शकतात.

विष्णू मुनी हे तपश्चर्या करायला मेरू पर्वतावर असतात.  त्या क्षेत्रातून ते हस्तीनापुर येथे आले. नमोचीला भेटले. नमुची यांनी फक्त तीन पावलं तुम्हाला देण्यात येतील असे निक्षून सांगितले. विष्णु मुनी यांनी विराट रूप धारण  केले. दोन पावलं ठेवल्यानंतर तिसरे पाऊल  कुठे ठेवावे ? असा प्रश्न  विष्णू मुनी यांनी नमुचीला विचारला.. तिसरे पाऊल आपल्या मस्तकावर ठेवा असे नमुची म्हणाला. विष्णु मुनी तिसरे पाऊल मस्तकावर ठेवतात व नमोचीचे अस्तित्व संपले.  त्यावेळी धर्माचे, साधू संतांचे रक्षण झाले. तो क्षण एकमेकांना धागा बांधून साजरा करण्यात आला. काळाच्या ओघात आज त्याचे स्वरूप बदललेले आहे. रक्षाबंधन याची महती आज देखील तितकीच महत्त्वपूर्ण आहे. असे जयपुरंदर मुनी यांनी उपस्थितांना आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून सांगितले.

—————-■■————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

Leave A Reply

Your email address will not be published.