कोळसा टंचाईची झळ ! आपत्कालीन भारनियमन होणार ?

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात काही दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. या पावसामुळे कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळशाचे प्रमाण कमी झाल्याने आता  कोळसा टंचाईची झळ बसणार आहे.  महानिर्मितीच्या राज्यभरातील सातही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांवर संकट आले आहे. नियमांनुसार महानिर्मितीच्या केंद्रांमध्ये १४ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक असणे अनिवार्य आहे. मात्र सध्या सरासरी चार दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज मिळणाऱ्या कोळशातून गरज भागवली जात आहे. महानिर्मितीत सरासरी सव्वा लाख टन कोळशाची तूट आहे.  तसेच सणासुदीचे दिवस सुरु असून राज्यातील गणेशोत्सव व आगामी काळातील सण उत्सवांमुळे दिवाळीपर्यंत विजेची मागणी कायम राहणार आहे. पूर्ण क्षमतेने अर्थात साडेसात हजार मेगावॅट वीजनिर्मिती करायची असल्यास किमान रोज ६७ हजार ५०० टन कोळशाची गरज भासते. त्यानुसार सध्या जवळपास सव्वालाख टनांची तूट आहे.

कोळसा खाणींमधून दररोज कमी प्रमाणात का असेना कोळसा उपलब्ध होत असल्याने वीजनिर्मिती सुरु आहे. कोणतेही केंद्र कोळशाअभावी बंद झाले नाही. परंतु  हीच स्थिती कायम राहिल्यास १०० टक्के क्षमतेने वीजनिर्मिती करण्यास अडचणी येतील. सद्यस्थितीत कंपनीच्या विविध औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये सरासरी चार दिवस पुरेल इतकाच कोळसासाठा आहे. महानिर्मिती कंपनीची औष्णिक वीजनिर्मिती क्षमता ९ हजार मेगावॉटच्या घरात आहे. मात्र प्रत्यक्षात सहा ते सात हजार मेगावॅट वीजेची निर्मिती होते.

 भारनियमन होणार ?

राज्यातील महानिर्मितीच्या सातही औष्णिक केंद्रातून कोळशाअभावी वीजनिर्मिती घसरली तर राज्यात पुन्हा काही वितरण ग्रुपवर वीजभारनियमन होण्याची भिती आहे. आगामी काळात सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्याची वीज मागणी सरासरी दीड हजार ते १७०० मेगावॅटने वाढू शकते. अशा वेळी निर्मितीही वाढविणे अपेक्षीत आहे. मात्र कोळशाअभावी ती वाढली नाही तर राज्याला पुन्हा आपत्कालीन भारनियमनाचा फटका बसेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.