लावणी आणि तमाशा समजून घेतांना

0

लोकशाही, विशेष लेख

 

लावणी (Lavani) म्हटलं की आपल्या समोर येते ती एक सुंदर लावण्यवती. मराठमोळ्या नऊवारी साडीत, जुडा टाकून त्यात गजरा, नाकात नथ, हातावर सुंदर ठिपके काढलेली ती मेहेंदी, पायात घुंगरू, गळ्यात ठुशी अशा एकदम पारंपरिक रुपामध्ये आपण त्या लावण्यवतीला बघतो. मात्र आता मूळ लावणी सादर करण्याऱ्या लावण्यवतीचा पेहराव हा बदलताना दिसतोय. आता पारंपरिक नऊवारी नसुन आपल्याला नेटच्या नऊवारी मध्ये आजच्या बऱ्याच लावण्यवती दिसतात. जुडा न टाकता मोकळे केस आणि बऱ्याच पारंपरिक गोष्टी त्यात मिसिंग असतात. पूर्वीच्या लावणी नृत्यांगना ह्या अंगभर वस्त्र परिधान करत. जसे सुरुवातीला मी सांगितले अगदी त्याच प्रमाणे. ती पारंपरिक मराठमोळी सुंदरता असायची. हा झाला दिसण्याचा भाग आता सादरीकरणा बद्दल बोलायचं झालं तर ते त्याहून ही सुंदर. नृत्यांगना ही अशा प्रकारे नृत्य सादर करायची की बसलेला प्रत्येक रसिक प्रेक्षक हा तिच्या प्रेमात पडलाच पाहिजे यामध्ये फक्त पुरुषच नाहीत तर महिला सुद्धा असायच्या. मनमोहक अदाकारीने ती लावण्यवती सर्वांना लावणीचा सुंदर आणि पारंपरिक आविष्कार दाखवायची. ह्या लावणी कलेने किती तरी रसिकांना आपल्या अस्सल अदाकारी आणि नृत्याने भुरळ पाडली. यासाठी कधीच तिला अश्लील हावभाव किंवा अश्लील नृत्याची गरज पडलीच नाही.

खरंतर लावणी मध्ये अश्लील नृत्य किंवा अश्लील हावभाव हे कधीच नसतात. पारंपरिक लावण्या अदाकारी, बाईपण, शृंगार आणि प्रेम यावर आधारित असतात. लावणी सादर करतांना हे लक्षात घेतलं पाहिजे की अश्लीलता आणि अदाकारी यात एक बारीक रेषेचं अंतर आहे. आणि हेच आजच्या बऱ्याच लोकांना कळत नाही याची खंत वाटते. आपण जेव्हा मूळ लावणी बघतो तेव्हा आपल्याला आजच्या लावणीतला आणि आधीच्या पारंपरिक लावणीतला फरक स्पष्टपणे दिसून येईल. परंतु आपल्याला जुन्या पारंपरिक लावण्या ह्या बोर वाटतात. कारण त्यात अस्सल अदाकारी असते आणि अस्सल अदाकारीला पसंती देणारे खूप कमी रसिक असतात. या बरोबरच आपण स्वतः आपल्या लावणी कलेला प्रोत्साहन देण्यापेक्षा तिला बदनाम केले आहे, असं दिसून येते. कारण आपण कधीच मूळ लावणी कला समजून घेतली नाही. आज ही आपण आपल्या मुलीला लावणीवर नाचू देत नाहीत, पण त्याच जागी एखादं इंग्लिश गाण्यावर नाचू देतो. नीट गाणं ऐकलं किंवा समजून घेतलं तर लक्षात येत की मुळात ते गाणंच अश्लील आहे.

हल्ली इंस्टाग्रामवर रिल्स नावाचा प्रकार मोठ्या प्रमाणात लहान मोठे प्रत्येक वयोगटातील लोक करतांना दिसतात. तिथे मात्र एखाद्या लहान मुलीने जर लावणीवर व्हिडिओ केले तर कॉमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या मानसिकतेचा अंदाज येतो. मात्र तिथेच त्याच मुलीने जर एखाद्या इंग्लिश गाण्यावर नृत्य केले किंवा हावभाव चे व्हिडिओ बनवले तर कौतुक केलं जातं. लावणी मुळातच एक शृंगारिक कला आहे. बाईपण, तिचं सौंदर्य, अदाकारी ह्या सर्वांचा एक ताळमेळ म्हणजे लावणी. लावणी नृत्य हा तमाशामधील एक घटक आहे. तमाशा एक लोककला प्रकार आहे. तमाशाची सुरुवात ही गणापासून होते. गणाने देवाला नमस्कार करून तमाशा सुरू होतो. त्यानंतर सर्व नृत्यांगना मुजरा करण्यासाठी रंगमंचावर येतात. रसिक प्रेक्षकांना सलाम करण्यासाठी हा मुजरा केला जातो. मुजरामध्ये फक्त ढोलकी, तूनतूना आणि हार्मोनियम ह्या वाद्यांचा वापर केला जातो. मुजरा झाल्यानंतर गवळण सदर होते. गवळण नृत्याआधी कृष्णा – पेंद्या , मावशी आणि गवळणी रंगमंचावर येऊन संभाषण करतात. कृष्ण गवळनींची वाट अडवतो. यात काही विनोद आणि अध्यात्मिक संभाषण होतात आणि सुरुवात होते.

गवळणीचे ४ प्रकार आहेत. हळीची गवळण यामध्ये कृष्ण जेव्हा गवळणींची वाट अडवतो तेव्हा गवळणी मिळून आपल्या संरक्षणासाठी मावशीला हाक देतात. ही हाक नृत्य, गीत, संगीत यामध्ये सादर होते. त्यामुळे तिला हाळीची गवळण म्हणतात. मावशी आल्यानंतर कृष्णाला मावशी ओळखत नाही. मावशी त्याला जाब विचारते कोण तू? तेव्हा कृष्ण आपली ओळख सांगतो आणि ती सादर होते, ओळखीची गवळण. जेव्हा सर्वांना खात्री पटते की तो कृष्ण आहे, तेव्हा मात्र सर्व गवळणी आणि मावशी कृष्णाची विनवण्या करू लागतात. मथुरेच्या बाजारी जाण्यासाठी उशीर होतोय म्हणून सांगू लागतात. तेव्हा सादर होते विनवणीची गवळण. गवळणी जेव्हा बोर्डावर एकत्र येतात तेव्हा एकमेकांची विचारपूस करतात मालाची विचारपूस करतात आणि नंदेच्या कान्हाने काय केलं ते सांगू लागतात. त्याचा नटखटपणा, खोडकरपणा आणि ठरवतात की चला आपण त्याची तक्रार यशोदे कडे करू, तेव्हा गवळणी तक्रारीची गवळण सादर करतात.

गवळण झाल्या नंतर बतावणी हा प्रकार सादर केला जातो. बतावणी म्हणजे बाता मारणे. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाला वाढवून मिठ मसाला लावून सांगणे म्हणजे बतावणी. यातून प्रेक्षकांचे मनोरंजन होते. आणि याच बतावणीमधून बतावणी सादर करणारे कलाकार तमाशाची सर्वात महत्त्वाचे घटक लावणी आणि लावणी सदर करणाऱ्या नृत्यांगनाची ओळख करून देतात. तिला रंगमंचावर नृत्य सादर करण्याठी आमंत्रित करतात. आणि लावणी सादर करण्यासाठी फडाची लावण्यवती रंगमंचावर येते. लावणी झाल्यानंतर वग सादर केला जातो. वगाच्या माध्यमातून अनेक सामाजिक विषयावर नाट्यमय स्वरूपात प्रबोधन केले जाते. या नंतर शेवट होतो ते भैरवी गीत सादर करून.

हे पारंपरिक तमाशाचा स्वरूप मात्र हल्ली नाहीसा झाला असून, तरुण पिढीला पारंपरिक तमाशा आणि लावणी नक्की काय असते हे माहीत नाही. याला कारणीभूत काही प्रेक्षक आणि आजचे सो कॉल्ड कलाकार आहेत. आज आपण बघतो ते विचित्र हावभाव आणि नृत्य करणारे कलाकार. मात्र पारंपरिक तमाशा आणि लावणी हे मनोरंजन त्याच प्रमाणे प्रबोधन करण्याचा काम करते. ,तामाशा, तमाशावाली, तमासगीर, नाचणारी, नाची, नाच्या (पुरुष जो स्त्री पात्र साकारत असतो उदा: मावशी) अश्या शब्दांना आपण आज अपमान करण्यासाठी, शिवी किंवा एखाद्याला खाली दाखवण्यासाठी वापरत असतो. मुळात हे सर्व कलाकार आपल्याहून जास्त प्रमाणात प्रबोधन करत असतात आणि आपल पोट प्रामाणिकपणे भरत असतात. मग हे शब्द अपमान करण्याच्या हेतूने वापरून आपण खरंच आदर्श व्यक्ती आहोत का? हा विचार करण्यासाठी भाग पडते आणि हा विचार आपल्याला आला पाहिजे.

आताचे तमाशाचे स्वरूप हे पूर्णपणे बदलून गेले आहे. मात्र आपल्याला महाराष्ट्राची लोककला तमाशा आणि त्याचे मूळ स्वरूप हे माहीत असले पाहिजे. एकेकाळी मनोरंजन आणि प्रबोधन करणारा हा लोककला प्रकार ज्याने समाज जीवनात मानाचे स्थान मिळवले होते. असा लोककला प्रकार आता फक्त रंजनप्रधान लोककला प्रकार म्हणून राहिला आहे. ‘पोटासाठी नाचते मी’ ही लावणी ऐकून खऱ्या आणि प्रामाणिक लावणी व तमाशा कलाकाराचे आयुष्य आपल्याला दिसून येते. तमाशा सम्राज्ञी विठ्ठाबाई नारायणगावकर (Vitthabai Narayangaonkar), सुरेखा पुणेकर(Surekha Punekar), मंगला बनसोडे, (Mangala Bansode) मेघा घाडगे(Megha Ghadge), आकांशा कदम (Akansha Kadam) यांच्यासारख्या प्रामाणिक लावणी कलाकार आज खूप कमी प्रमाणात आपल्या कला सादर करतांना दिसतात आणि खऱ्या अर्थाने तमाशा आणि लावणीचे मूळ स्वरूप जोपासतांना दिसतात.

पारंपरिक लावणी आणि तमाशा हा जपला पाहिजे. लावणी देशोविदेशी सादर झाली आणि तिकडे तिने मान मिळवला मात्र आपल्याच देशात आणि आपल्याच राज्यात अंग दाखवण्यासाठी सादर केलेली लावणी कुठे आणि पारंपरिक अंगभर झाकून मराठमोळे दागिने जूडा त्यात मोगऱ्याचा गजरा आणि चेहेऱ्यावर येणारी ती बट ज्यामधे कित्येक प्रेक्षकांचे श्वास अडकतात. अदाकारीने घायाळ करणारी ती नजर जी रात्री सुद्धा आपल्या डोळ्यासमोर येत असते, जी लावण्यवती फक्त पुरुषांनाच नाही तर महिलेलाही शिट्टी मारण्यास भाग पडते. कुठे तरुण पिढीला ही पारंपरिक लावणी माहीत नाही. आपली पारंपरिक लोककला कुठे तरी हरवत चालली आहे याची खंत वाटते.

गायत्री मनोज ठाकूर
८३२९९७७१७६

Leave A Reply

Your email address will not be published.