कान्ह ललित कला केंद्राची एकांकिका कंदीलची राष्ट्रीय स्तरावर निवड

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन, 27 राज्यांची राहणार उपस्थिती

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणेमार्फत राज्यस्तरीय युवक महोत्सवाचे आयोजन दिनांक 28 ते 31 डिसेंबरदरम्यान उदगीर, जि. लातूर या ठिकाणी करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील आठ महसूल विभागातून कान्ह ललित कला केंद्र, जळगावची वैभव मावळे लिखित एकांकिका कंदीलने आठ विभागातून प्रथम पारितोषिक पटकावून तिची राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आली आहे. कान्ह ललित कला केंद्र, विभाग नाशिक आता 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात प्रतिनिधित्व करणार के.सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, सांस्कृतिक समन्वयक व प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर व प्रा. डॉ एस.एन भारंबे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कान्ह ललित कला केंद्राचे संचालक प्रा. प्रसाद देसाई यांच्या नेतृत्वात संघाने यश मिळवलेले आहे.

12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे म्हणजेच युवादिनाचे औचित्य साधत साजरा होणार्या 27 व्यां राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी 27 राज्यातील युवकांची मांदियाळी राहणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणेमार्फत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते . जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर केंद्र शासनाने राज्याला दिलेल्या संकल्पना आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश करण्यात आलेले आहेत. युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी युवा महोत्सवासाठी नियम व सूचना आधारित निर्गमित केलेले होत्या. त्यानुसार आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी यासंदर्भात युवा महोत्सव घेण्याचे सूचित केले होते. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली होती. त्यावर उदगीर जिल्हा लातूर येथे हा महोत्सव पार पडला. यात अमरावती, नाशिक, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सातारा, लातूर, संभाजीनगर या विभागांचा यात समावेश असून यावेळी 900 युवकांची उपस्थिती होती.

त्यानुसार या स्पर्धा सुरू असून यात प्राथमिक, विभागीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर युवांना आपल्या कला दाखवण्याचा आणि त्यात पारंगत होण्याचा बहुमान मिळत असतो. त्याचप्रमाणे त्यांना शासनातर्फे प्रमाणपत्रासह रोख रकमेचे ही बक्षीस मिळत असल्याने यामुळे युवांचा उत्साह द्विगुणीत होत असतो. यात आता कान्ह ललित कला केंद्राने एकांकिका या कला प्रकारात पहिले बक्षीस मिळवून् बाजी मारली असून पुढील 12 जानेवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी चमू सज्ज झाला आहे . विद्यार्थ्यांना प्रा. पियुष बडगुजर, दिनेश माळी, प्रा. अजय शिंदे, प्रा. देवेंद्र गुरव, प्रा. वैभव मावळे, प्रसाद कासार आणि प्रा. हेमंत पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे. विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी उपसंचालक नाशिक क्रीडा विभाग तथा जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव रवींद्र नाईक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

नाशिक विभागाने मिळवलेली बक्षिसे
एकांकिका प्रथम, कुणाल जाधव (फोटोग्राफी द्वितीय), शुभम जाधव (कथा लेखन द्वितीय), सागर साठे (फोटोग्राफी तृतीय), सलोनी जैन ( वक्तृत्व तृतीय), जान्हवी महाजन ( पाककला तृतीय) , गायत्री कुमावत ( प्रदर्शन कला तृतीय), आनंद हिवरे ( ऍग्रो प्रथम).

विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर यश मिळवून राष्ट्रीय स्तरावर मारलेली मजल ही खरंच वाखाणण्याजोगी आहे. या यशाने भारावून न जाता राष्ट्रीय स्तरावर नाशिक विभागाचा आणि कान्ह ललित कला केंद्राचा डंका कसा गाजवता येईल, याची आखणी आता सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थी नक्कीच राष्ट्रीय स्तरावर यश मिळवतील, ही आशा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.