करार शेतीतून टोमॅटो, पांढरा कांदा लागवड करून शाश्वत उत्पन्न घ्यावे- गौतम देसर्डा

0

जैन फार्म फ्रेश फुड्स लिमिटेड व कागोमीतर्फे बिडगावला शेतकरी चर्चासत्र संपन्न

बिडगाव ता. चोपडा , लोकशाही न्युज नेटवर्क
शेतकऱ्यांनी जैन इरिगेशनच्या करार शेती अंतर्गत कांदा, टोमॅटो आणि मसाल्याची पिके घेऊन शाश्वत उत्पन्न मिळवावे असे आवाहन करार शेती प्रमुख गौतम देसर्डा यांनी केले. जैन फार्म फ्रेश फुड्स लिमिटेड व कागोमीतर्फे बिडगावला शेतकरी चर्चासत्र घेण्यात आले त्यात उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी सुसंवाद साधला. यावेळी व्यासपीठावर जैन फार्म फ्रेश फूडस् लिमिटेडचे रोशन शहा, करार शेती विभागाचे गौतम देसर्डा, कागोमीचे भारताचे हेड मिलन चौधरी, शेतकरी प्रकाश पाटील, कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. केपाटील,, इफको कंपनीचे निलेश चौधरी उपस्थित होते. बिडगांव पंचक्रोशी, चोपडा, अमळनेर, धरणगाव, चाळीसगाव तालुक्यातील शेतकरी चर्चासत्रमध्ये सहभागी झाले होते.

चोपडा तालुक्यातील बिडगाव येथील प्रगतीशील शेतकरी प्रकाश पाटील यांच्या शेतात लागवड केलेल्या जैन कंपनीचा पांढरा कांदा ‘जेव्ही 12’ आणि ‘कागोमी टोमॅटो’ पीक लावलेल्या प्रक्षेत्राची शेतकर्‍यांनी पाहणी केली. कृषीतज्ज्ञ विरेंद्रसिंग सोळंकी आणि कृषीतज्ज्ञ श्रीराम पाटील यांनी पीक व ठिबक सिंचन, तुषार सिंचन याबद्दल शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकासह माहिती दिली. कागोमी कंपनीचे मनोहर देसले यांनी टोमॅटोचे वाण, टोमॅटो लागवडी बाबत माहिती दिली. जैन इरिगेशनचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. के. यांनी जैन इरिगेशन आणि भारतात जितकी महत्त्वाची कांदा व्हरायटीज आहेत त्याबाबत माहिती दिली. जैन हिल्स येथे भारतात 80 कांदा व्हरायटीज लागवड केलेली आहे. त्यातील 40 कांदा व्हरायटी जैनने विकसित केलेली आहे. कांदा पिकाचे सर्वच बाबतीत सतत संशोधन कार्य सुरू आहे. श्रद्धेय मोठ्याभाऊंनी शेतकऱ्यांना उत्तमातील उत्तम देण्याचे अभिवचन आजही पाळण्यात येत असल्याचा भाषणात उल्लेख केला. सध्या महाराष्ट्रभरातील शेतकरी कांद्याच्या व्हरायटी, मशनरी इत्यादी बघण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी येत आहेत. या कांदा लागवड क्षेत्रास अवश्य भेट द्यावी असे आवाहन केले. कांदा लागवड ते काढणी दरम्यान लागणारी मशनरी, यंत्र, अवजारे आदींची मांडणी करण्यात आलेली आहे. या सोबतच कांदा रोपे व अन्य तांत्रिक माहिती त्यांनी दिली.

ज्यांच्या शेतात “टोमॅटो, कांदा शेतकरी चर्चासत्र” झाले असे प्रगतीशील शेतकरी प्रकाश पाटील यांनी जैनचा पांढरा कांदा आणि टोमॅटो लागवडीच्या प्रयोगाबद्दल आपला अनुभव सांगितला. लागवड, सिंचन, पिकांची घेतलेली काळजी इत्यादी विषयी ते बोलेले. आपल्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि शेतीचे अनुभव त्यांनी उपस्थितांना सांगितले. उपस्थितांना शेतीचे अर्थकारणही समजावून सांगितले ते म्हणाले की, माझ्या शेतात पंधरा हजार टोमॅटोची रोपे लावली आहेत, एका झाडाला 6 किलो टोमॅटो लागतील. लागवड ते काढणीपर्यंत 35 ते 40 हजार रुपये खर्च आला. चार महिन्यात टोमॅटोचे सुमारे एक ते सव्वा लाख रुपये इतके उत्पन्न अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या टोमॅटोची आवक जास्त असल्यामुळे टोमॅटोचे भाव गडगडले आहेत. असे असून देखील करारानुसार तो सगळा टोमॅटो जैन इरिगेशन हमी भावाने खरेदी करतात. त्यामुळे मला शाश्वत उत्पन्न मिळत आहे ही बाब त्यांनी उपस्थितांना आवर्जून सांगितली.

कागोमीचे भारतातील प्रमुख मिलन चौधरी यांनी कागोमी कंपनी आणि टोमॅटो व्हरायटी बाबत सविस्तर सांगितले. जैन फार्म फ्रेश फूडस लिमिटेडचे सहकारी रोशन शहा यांनी जागतिक पातळीवर अन्न पदार्थ आणि निर्यात, नियम-अटी याबद्दल विस्ताराने सांगितले. कांदा-भाजीपाला प्रक्रिया, फळ प्रक्रिया आणि आता जैन फार्म फ्रेश फूड लिमिटेड मसाला उद्योग मध्ये आहे त्यासाठी हळद, आले, धणे, लाल मिरची इत्यादी शेतकरी कच्चा माल पुरवठा करतील. आपण काय खातो याबद्दल जागतिक पातळीवरील ग्राहक सजग झाला आहे त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीने पिके घ्यावे लागतील ह्या बाबतीत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले.

यावेळी मान्यवरांच्याहस्ते शेतकरी प्रकाश साहेबराव पाटील, नितीन रमेश पाटील, दिलीप धनाजी पाटील, रामकृष्ण पाटील, नरेश बडगुजर या शेतकर्‍यांना प्रातिनिधिक फेरोमन ट्रॅप वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरेंद्रसिंग सोळंकी यांनी केले. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी कंपनीचे सेल्स इंजिनिअर विनायक महाजन यांनी ठिबक सिंचन संच आणि त्याची घ्यावयाची काळजी ह्याबद्दल मार्गदर्शन केले. पिकाची, जमिनीची परिस्थिती लक्षात घेऊन निवड करायला हवी याबाबत ही त्यांनी मार्गदर्शन केले.

पथराड येथे 8 फेब्रुवारीला करार शेती कांदा, टोमॅटो शेतकरी चर्चासत्र

जैन फार्म फ्रेश फुडस् लि. आणि कागोमी कंपनीच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 8 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता शेतकरी मेळावा आयोजण्यात आलेला आहे.धरणगाव तालुक्यातील पथराड येथील प्रयोगशील शेतकरी श्रीकांत विठ्ठल चव्हाण यांच्या शेतात (पाळधी-पथराड रोडवर) हा कार्यक्रम होणार आहे. कांदा व टोमॅटोची लागवड करण्यास इच्छूक शेतकऱ्यांना या चर्चासत्रात सहभाग घेता येईल असे आयोजकांनी कळविलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.