सोमय्यांची जखम खरी की खोटी ?, वैद्यकीय अहवालातून धक्कादायक खुलासा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

हनुमान चालीसा पठाणावरून झालेल्या संघर्षामुळे रवी राणा आणि नवनीत राणा दाम्पत्यावर सध्या कारवाई सुरु आहे. राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर खार पोलीस ठाण्याबाहेर हल्ला झाला होता.

हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. तसेच या हल्ल्याविरोधात भाजपाने आक्रमक भूमिका घेतली होती. या हल्ल्यात आपल्याला दुखापत झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. तर सोमय्यांना झालेली दुखापत खोटी असल्याचे संजय राऊत आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांनी म्हटले होते. दरम्यान, किरीट सोमय्यांना झालेल्या दुखापतीचा वैद्यकीय अहवाल समोर आला असून, त्यात धक्कादायक माहिती नमूद करण्यात आली आहे.

किरीट सोमय्यांनी आपल्याला दुखापत झाल्याचा दावा केल्यानंतर त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. या वैद्यकीय चाचणीबाबतचा भाभा रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. या अहवलामध्ये किरीट सोमय्या यांना किरकोळ जखम झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांना जखम झाली मात्र त्यातून रक्तस्त्राव झाला नाही असे या वैद्यकीय अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच किरीट सोमय्यांना गंभीर इजा झाली नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दरम्यान, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावर दिल्लीवारी केली आणि केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन ठाकरे सरकारची तक्रार केली होती. या मुद्द्यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. “एक माथेफिरू सध्या ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून जखमी झाल्याचा दावा करत जगभर फिरत असेल तर अशा व्यक्तीच्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे”, असा टोला संजय राऊत यांनी सोमय्यांना लगावला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.