खामगावात “मुन्नाभाई” डॉक्टरांचा गोरखधंदा

0

खामगाव (गणेश भेरडे), लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोना काळात संपूर्ण आरोग्य यंत्रणा गुंतलेली असतांना याचा फायदा बोगस (मुन्नाभाई) डॉक्टरांनी घेतला. सदर बाब समोर येताच आरोग्य विभागाने तालुका आरोग्य अधिकार्‍यांना बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने खामगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांच्या पथकाने जुलै २०२२ मध्ये केलेल्या तपासणीत शहरात ३ मुन्नाभाई डॉक्टर आढळून आले होते. मात्र बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करण्यासाठी नियुक्त केलेली समिती केवळ कागदावरच असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरुन दिसुन येत आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांचा गोरखधंदा अद्यापही सुरु असून यासाठी मोठया प्रमाणावर आर्थिक तडजोड झाल्याचे बोलले जात आहे.

बोगस डॉक्टर बनावट डिग्रीच्या आधारे दवाखाना थाटून भोळ्याभाबड्या गरीब व अशिक्षित रुग्णांची फसवणुक केली जाते आहे. विशेष बाब म्हणजे बोगस डॉक्टरांकडून कोणत्याही आजारावर एकच उपचार पद्धत (चुकीची) अवलंबील्या जात असल्याने किरकोळ आजाराच्या रुग्णांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. आरोग्य विभागाकडून अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करुन फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी जनतेतून होत आहे. पण कशाचे काय? तपासणीत बोगस डॉक्टर आढळला म्हणजे संबंधित अधिकार्‍यांना जणू काही आपले उखळ पांढरे करण्याची संधी मिळते अशी शंका जनतेत व्यक्त केल्या जात आहे.

उपरोक्त बोगस डॉक्टर प्रकरणी काय कार्यवाही करण्यात आली ? यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाष खंडारे यांना विचारणा केली असतांना त्यांनी सुरुवातीला ३ बोगस डॉक्टर आढळल्याचे सांगीतले व कार्यवाहीचा प्रस्ताव दिल्याचेही सांगीतले. या बाबीला दिड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटून गेला तर सदर प्रकरणी सेटलमेंट झाल्याची माहिती मिळाल्याने डॉ. अभिलाष खंडारे यांना भ्रमणध्वनीद्वारे कार्यवाहीबाबत माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. तर प्रत्यक्ष भेटण्यासही टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे नक्कीच कुठेतरी पाणी मुरत असून याकडे वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. नाहीतर मुन्नाभाई डॉक्टर गरीब रुग्णांच्या जिवाशी खेळण्यास मोकळे होतील एवढे मात्र नक्की.

Leave A Reply

Your email address will not be published.