खडके बालगृहातील गैरप्रकार दडपण्यामागचे कटकारस्थान

0

खडके बु. अत्याचार प्रकरण भाग – १ 

 

– अत्याचार पीडित मुलींना न्याय मिळणे आवश्यक

– केअर टेकरकडून पाच वर्ष सातत्याने अत्याचार

– दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्यांचा घेतला गैरफायदा 

– बालकल्याण समितीनेच केला पहिला गुन्हा दाखल 

– आ. खडसेंनी अधिवेशनात मुद्दा मांडून वेधले लक्ष

– तपास थंडावण्याच्या कारणांचा घेतला जाणार शोध

 

एखादी घटना घडते, तिची काही दिवस चर्चा होते आणि कालांतराने ती घटना काही ना काही कारणास्तव दाबली जाते, ही हल्लीची सामान्य परिस्थिती आहे. अशाच कितीतरी केसेस देशभरासह राज्य आणि स्थानिक जिल्हा पातळीवर देखील आढळून येतात. बऱ्याचदा या घटना जशा  आहेत तशा  त्या दाखवल्या जात नाहीत. त्यांना वेगळे वळण देऊन नगरीकांना भ्रमात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र काही सुज्ञ नागरिक यामध्ये बारकाईने विचार करतात आणि ती घटना खऱ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करतात. परिस्थिती मुळात जशी समोर दिसत असते तशी ती नसते मात्र तिला तशी दाखवली गेल्यामुळे ती तशी समोर येत असते. आणि अशा पद्धतीलाच राजकारणाचा हस्तक्षेप किंवा वरिष्ठांचा वरदहस्त अशा शब्दांचा प्रयोग केला जातो.. अशीच एक घटना आपण एक त्रयस्त मात्र तितकेच तटस्थ आणि निपक्षपणाने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत..

घटना आहे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेल्या खडके बुद्रुक येथील कै. यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित (तळई) अनाथ मुला मुलींचे बालगृह व वस्तीगृहातील. या वसतिगृहामध्ये मुला-मुलींवर अत्याचार झाल्याची घटना जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उघडकीस आली होती. या प्रकरणात वसतिगृहाचा काळजीवाहक गणेश पंडित यांणे अल्पवयीन पाच मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. पुढे तपासातून काळजीवाहक गणेश पंडित याने अल्पवयीन मुलावर देखील अत्याचार केल्याचे समोर आल्याने खळबळ माजली. दरम्यान या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष, त्यांची दोन्ही मुले, काळजीवाहक व मारहाण करणाऱ्या आठ अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अनाथ मुलांच्या बालगृहात अल्पवयीन मुला-मुलींचे संगोपन केले जाते. सुमारे सहा ते चौदा वयोगटातील पाच अल्पवयीन मुलींनी संस्थेचा काळजीवाहक म्हणून असलेल्या संशयित आरोपी गणेश शिवाजी पंडित यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार जळगावच्या बालकल्याण समितीकडे केली होती. यावेळी समिती अध्यक्षा ॲड. देवयानी गोविंदवार, सदस्या ॲड. विद्या बोरनारे , वृषाली जोशी आणि वैशाली विसपुते यांनी संबंधित मुलींची आपबीती जाणून घेतली होती. पुढील तपासात आरोपी असलेल्या काळजीवाहक गणेश पंडितने गेल्या पाच वर्षापासून मुलींचे शोषण केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. मुलींच्या जबाबात अनेक धक्कादायक बाबी देखील समोर आल्या. विशेष म्हणजे ६ ते १४ वयोगटातील १९ मुले व २१ मुली या बालगृहात वास्तव्याला होत्या. त्यांचे शेजारी असलेल्या शाळेत शिक्षण देखील सुरू होते.

बालगृहात काळजीवाहक संशयित आरोपी गणेश शिवाजी पंडित याने यातील काही मुलींवर लैंगिक अत्याचार केला होता. एवढेच नव्हे तर या नराधमाने मुलांना देखील सोडले नाही, अशी धक्कादायक माहिती तपासातून निष्पन्न झाली. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बालगृहात काही मुलं आपल्या गावी जात असल्याने मोजक्यात मुली तेथे असायच्या. या संधीचा गैरफायदा गणेश पंडित घेत असे. या अनाथ बालगृहातील नऊ मुलींवर काळजीवाहकाच्या रुपात भक्षक असलेल्या गणेश पंडितने पाच वर्ष लैंगिक अत्याचार केले. जेव्हा त्या मुली तक्रार करत किंवा रडत असत तेव्हा तो त्यांना मारहाण करायचा. मुलींना फोनवरून घरी बोलणे करून द्यायचा आणि त्या बदल्यात त्यांचा गैरफायदा घ्यायचा. तसेच त्यांना स्वतःच्या घरी नेऊन जबरदस्ती करून शारीरिक संबंध ठेवायचा. या नराधमाने तर एका मुलावर देखील अत्याचार केल्याचे पीडितांनी पोलिसांना सांगितले आहे.

अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदनवाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ मुलींसह एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली, तर काही आरोपींनी अटकपूर्व जामीनसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. लवकरच त्यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात येईल. असे देखील त्यांनी सांगितले होते.

या प्रकरणी बालगृहाच्या अधीक्षिका आणि केअरटेकरच्या पत्नी असलेल्या अरुणा पंडित व संस्थेचे सचिव भिवाजी पाटील यांच्याकडे या मुलींनी तक्रार केली होती, हे देखील उघडकीस आले. मात्र दुर्दैवाची बाब अशी की या अत्याचाराच्या घटनेकडे अधीक्षिका असलेल्या अरुणा पंडित आणि संस्थेचे सचिव असलेल्या भिवाजी पाटील यांनी साफ कानाडोळा करून दुर्लक्ष केले. ही अत्यंत खेदाची बाब आहे. मात्र बाल कल्याण समितीने मात्र याची दाखल घेऊन २६ जुलै २०२३ रोजी एरंडोल पोलीस स्थानकात याबाबत गुन्हा दाखल केला आणि तपासाचे सत्र सुरु झाले. २५ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील निर्देश बाल कल्याण समितीने पोलीसांना व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना पत्राद्वारे दिले होते.

दरम्यान या प्रकरणात ३ ऑगस्ट २०२३ रोजी बालकल्याण समितीचे अध्यक्ष आणि संस्थाध्यक्षांसह सहा जणांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. केअर टेकर गणेश शिवाजी पंडित याला अटक करण्यात आली. तसेच गणेशची पत्नी तथा अधीक्षिका अरुणा गणेश पंडित व संस्था सचिव भिवाजी दीपचंद पाटील यांच्यावर देखील मुलींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, त्यांची मुले सचिन आणि भूषण, बालकल्याण समिती अध्यक्ष देवयानी गोविंदवार, सदस्य विद्या बोरनारे, संदीप पाटील, शिक्षक प्रमोद पाटील यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. सोबतच एका अल्पवयीन मुलावरही लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी केअर टेकरसह चार मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पोलीस कारवाई देखील करण्यात आली होती.

पुढे कै. यशवंतराव बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द करण्यात आली. राज्य महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी याबाबतचे आदेश देखील जारी केले, आणि या बालगृहातील बाललैंगिक अत्याचाराच्या सखोल चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती देखील स्थापन केली. ३ ऑगस्टपर्यंत त्याचे अहवाल सादर करण्याबाबत त्यांना सूचना करण्यात आल्या.

दरम्यान याआधी मात्र बालकल्याण समितीच्या अध्यक्ष देवयानी गोविंदवार यांचेसह सदस्यांनी २६ रोजी २०२३ रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल केला होता, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी हा मुद्दा २७ जुलैच्या अधिवेशनात देखील उचलून याबाबत चौकशीसाठी विनंती केली होती.

दरम्यान प्रकरणी गेल्या पाच महिन्यापासून पुढे काय प्रक्रिया झाली याचा उहापोह करण्याचा प्रयत्न आहे. सदर प्रकरण न्याप्रविष्ट आहे. तरी यात अनेक अशा मुद्द्यांवर मात्र गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या एकंदर केसचा विचार करता यातील अनेक अशा गोष्टी या दुर्लक्षित केल्या जात असल्याचं समोर येतं. जर गेल्या पाच वर्षापासून असे गैरप्रकार चालू होते, तर गेल्या पाच वर्षात याबाबत ठोस पावले का उचलली गेली नाहीत? एकंदरीत हे प्रकरण आतल्या आत दाबण्याचा प्रयत्न तर केला गेला नाहीये ना? हा अत्र फक्त साधा एक प्रश्न आहे. या सारखे अनेक प्रश्न या विशेष सदरातून उपस्थित केले जाणार आहेत.. या संदर्भातील अनेक अशा ठळक बाबींवर यातून विचार करणार आहोत आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाणायचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे कदाचित या प्रकरणाला एक वेगळी कलाटणी देखील येईल किंवा कदाचित खरी परस्थिती समोर आल्याने काहींचे अवसानही गळेल.. मात्र या पीडितांना न्याय मिळावा एवढाच यामागच शुद्ध हेतू असणार आहे हे मात्र निश्तित..

पुढच्या भागात आपण या प्रकरणात तपासाच्या बाबीतील काही त्रुटींचा विचार करणार आहोत. या त्रुटींमधून या तपासात काय नेमक्या बाबी समोर आल्या आणि काय नेमके प्रश्न निर्माण झाले, ज्यामुळे हा प्रश्न पुन्हा अशा प्रकारे नागरिकांपर्यंत न्यावा लागला याबाबत विचार करणार आहोत..

 

 

– राहुल पवार

उपसंपादक, दै. लोकशाही

Leave A Reply

Your email address will not be published.