वाळू माफियांच्या मुसक्या वेळीच आवळा

0

लोकशाही संपादकीय लेख 

जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांची मग्रुरी दिवसेंदिवस वाढत आहे. गिरणा तापी नद्यांमधील अवैध वाळू उपसा करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. तो आपला हक्कच आहे, या तोऱ्यात अवैध वाळूची तस्करी ते करतात. अवैध वाळूच्या तस्करीला कोणी अडथळा करीत असेल अथवा अडकाठी घालत असल्यास ते आम्ही सहन करणार नाही, या अविर्भावातच ते वाळूची तस्करी करत आहेत. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत तर हे वाळू माफिया बावचळले आहेत. आतापर्यंत महसूल खात्यातील कर्मचारी, तहसीलदार आदी अवैध वाळूच्या तस्करीवर नियंत्रण आणणाऱ्यांना न जुमानता वाळूची तस्करी करीत होते.

गिरणा अथवा तापी नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर, ट्रक महसूल खात्यामार्फत रंगेहात पकडले गेले, तरी त्यांना न जुमानता प्रसंगी त्यांच्यावर दहशत दाखवून, मारहाण करून त्यांच्या हातावर तुरी देऊन ते तस्करी करणारे पसार होतात. त्याचे वाळूने भरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, तरी त्यांना त्याचे कसलेही सोयरे सुतक नसते. जप्त केलेली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून पळवून नेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला तरी त्यांना काही फरक पडत नव्हता. गेल्या सहा महिन्यात जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतलेले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सहकार्याने अवैध वाळू उपसावर तसेच अवैध वाळू वाहतुकीवर कडक निर्बंध आणल्याने वाळू माफिया बावचळले आहेत.

काही दिवसांपूर्वी चोपड्याचे प्रांताधिकारी यांना अवैध वाळू वाहतुकीचा ट्रॅक्टर अडवला म्हणून त्यांच्यावर ट्रॅक्टर घालण्यापर्यंतची मजल वाळू माफियांनी मारली. यामध्ये प्रांताधिकारी यांच्या कारचे नुकसान झाले आणि स्वतः प्रांताधिकारी जखमी झाले. ट्रॅक्टर चालकावर तसेच ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तथापि कायद्यातील पळवटांचा फायदा हे वाळू माफी घेतात आणि सही सलाम सुटून पुन्हा अवैध वाळूची तस्करी करायला तयार असतात. कारण अवैध वाळूच्या तस्करीचा वारेमा पैसा त्यांच्याजवळ असल्याने त्या पैशाचा जोरावर ते मोठमोठे वकील लावून गुन्ह्यातून सुटका करून घेतात त्यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी करून वरिष्ठ पातळीवरून या वाळू माफियांच्या मुसक्या आवळणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गेल्या सहा महिन्यात जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीवर गुन्हे दाखल करून जिल्ह्यातून हद्दपार करण्यात येत असल्याने आता वाळू माफियांनी आपला मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांकडे वळवला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जेथे कुठे जातात त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा प्रकार वाळू माफियांकडून केला जात आहे. त्याचा अनुभव खुद्द जिल्हाधिकाऱ्यांना आलेला आहे. ही बाब अत्यंत गंभीर म्हणावी लागेल, कारण वाळूमाफियांकडून खुद्द जिल्हाधिकारी असुरक्षित आहेत, तर सर्वसामान्यांचे काय? यामागे नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे रॉकेल माफियांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारींणी अवैध रॉकेलचे टँकर पकडले तर त्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्यात आले होते. त्या वेळेच्या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. परंतु रॉकेल टँकरवर धाड टाकणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांचा हेतू शुद्ध नव्हता असे म्हटले जाते. हप्तेवाडीच्या वादातून हा प्रकार घडला अशी उलट सुलट चर्चा यावेळी गाजली होती. परंतु जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे एक निस्पृह आणि निष्कलंक असे अधिकारी आहेत. त्यामुळे वाळू माफियांना हे अत्यंत महागात पडणार आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संपूर्ण वाळूच्या तस्करीचा गुप्तपणे तपास करून त्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सहकार्याने बीमोड करावा. दोन-चार वाळू माफियांवर एमपीडीएची कारवाई झाल्याचे जाहीर झाले की, इतरांची हिंमत होणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आता मागे वळून न पाहता या वाळू माफियांचा मुसक्या आवळल्या तर जिल्ह्यातील गुन्हेगारांवर आपोआप दहशत निर्माण होईल…!

Leave A Reply

Your email address will not be published.