सदर प्रकार माझ्या मुलीसोबत घडला असता तर?

0

खडके बु. अत्याचार प्रकरण भाग – २

सावत्रीमाई फुले जयंती निमित्त सामाजिक खडके बालिका अत्याचाराचा सामाजिक आढावा

अशा घटनांना आळा बसणं हे शासनासोबत प्रत्येक सुज्ञ नागरिकाचं आद्य कर्तव्य

पीडितांच्या मानसिकतेचा विचार का केला केला जात नाही, हेच भीतीदायक

 

लोकशाही मागोवा विशेष

आज सावित्रीमाई फुले जयंती आहे. सावित्रीमाईंनी शिक्षण क्षेत्रात दिलेलं योगदान हे कुठेही तुलना करता येणार नाही, या पातळीवरचे आहे. वास्तविक त्यांच्या कार्याची ‘तुलना करणे’ हा शब्दप्रयोग देखील त्यांच्या कार्याचा अपमान करणारा ठरू शकतो, असं माझं वैयक्तिक मत आहे. सावित्रीमाईंनी स्त्री शिक्षणासाठी जे पाऊल उचललं, त्यासाठी ज्या हाल अपेष्टा भोगल्या आणि या अशा परिस्थितीत राहूनही स्त्री शिक्षणाची बीजं रोवली, ती अमूल्य अशी आहेत. आज महिला मुक्ती दिन देखील साजरा केला जातो. मात्र महिलांच्या या विशेष म्हणवल्या जाणाऱ्या दिनी देखील महिलांच्या सक्षमीकरणासोबतच त्यांच्यावर होणारे अन्याय, अत्याचार थांबलेत का? हा खूप मोठा प्रश्न मेंदूला झिणझिण्या आणतो. आजच्या या विशेष दिनाच्या निमित्ताने मात्र समाजाला काही प्रश्न विचारावेसे वाटतात; जे रास्त आहेत..

एरंडोल तालुक्यातील खडके बुद्रुक बालगृहात घडलेला अत्याचाराचा प्रकार हा काही एका दिवसाचा नव्हे. तब्बल २०१८ पासून या ठिकाणी अनाथ अल्पवयीन मुलींवर अन्याय अत्याचार होत होते. त्यांच्या गरिबीचा, त्यांच्या एकटेपणाचा, त्यांच्या साधे भोळेपणाचा गैरफायदा घेऊन शोषण सुरू होते आणि याबाबत तक्रार करूनही दखल घेतली जात नव्हती, ही मात्र स्त्री पणाला लाजवणारी गोष्ट आहे. एका विशिष्ट नावाने शिक्षण प्रसारक मंडळ या नावाखाली बालगृह चालवायचं म्हटलं तर तितक्या मोठ्या स्वरूपाच्या जबाबदाऱ्या देखील स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागते. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला काळजीवाहक म्हणून नेमले आहे ती व्यक्ती त्याच संस्थेच्या अधीक्षक असलेल्या महिलेचा पती आहे, हे देखील आश्चर्य करण्यासारखेच आहे. सोबतच मुलींनी जेव्हा याबाबत तक्रार केली तेव्हा देखील घेतली गेली नाही.

घटनेच्या बाबतीत विचार करत असता विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या ठोस माहितीनुसार, पीडित बालकांवर झालेले अत्याचार बालिकांच्या मनावर प्रचंड आघात करणारे असूनही ५ वर्षात त्या कुणाजवळ व्यक्त झाल्या नाहीत? असा अत्याचार करणे म्हणजे एक प्रकारे मानसिक विकृतीच म्हणता येईल. सर्वसामान्य माणसाकडून अशी अपेक्षा नाही. मात्र यात जेव्हा आपण, ज्या ज्या मुलींवर असे अत्याचार झाले त्यांच्या बाल मानसिकतेचा विचार करतो तेव्हा मात्र या गोष्टी मन सुन्न करणाऱ्या आहेत. हा प्रकार आपण ऐकून जितके धास्तावतो त्यापेक्षा कैक पटीने अधिक त्या मुलींनी ते सहन केलेल असतं आणि त्यांच्या बालमनावर याचा किती गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम झाला असेल, याचा आपण विचारही करू शकत नाही. ज्या वयात शिक्षण देऊन बालकांना एका विशिष्ट वळणाला लावायचे असते, त्यांच्या आयुष्याला आकार द्यायचा असतो, त्या वयात त्यांनी भोगलेली परिस्थिती ही त्यांना आजन्म त्रास देणारी ठरणार आहे, याचा विचार असे नराधम मुळात करतच नाहीत.

एकीकडे सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणासाठी सहन केलेल्या यातना, तर दुसरीकडे कुणाचाही आधार नसलेल्या (?) पीडित बालिकांवर नराधमाने आपल्या वासनेच्या भुकेतून केलेले अत्याचार मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. या अशा घटनांना आळा बसणं हे शासनाचं तसेच समाजातील प्रत्येक सुज्ञ नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. निदान या भावनेतून तरी या संदर्भातील केसवर विचार होणे गरजेचे आहे. निदान आता तरी या केसचा तपासाचा वेग वाढावा एवढेच या निमित्ताने बोलावेसे वाटते. मात्र अद्यापही याबाबत विचार करून आपल्यातील माणूसपणाला भीती वाटत नसेल, तर सदर प्रकार हा “माझ्या घरातील एखाद्या मुली सोबत किंवा माझ्या स्वतःच्या मुली सोबत किंवा माझ्या बहिणी सोबत घडला असता तर मी कोणत्या मानसिकतेने यावर विचार केला असता?” याचा तरी विचार होणे अत्यंत गरजेचे आहे.

ज्या वयात संगोपन होणं आवश्यक असतं त्या वयात अत्याचाराच्या यातना पीडा सहन कराव्या लागत असतील तर अशा बालिकांमध्ये माणुसकीला आणि समाजातील इतर सर्व नैतिक जाणीवांना काय महत्त्व राहील? हा देखील प्रश्न अत्यंत भयंकर स्वरूपाचा आहे. त्यामुळे या केसवर एक माणूस म्हणून पुनर्विचार करणे देखील गरजेचे होऊन जाते. पुढल्या भागात आपण अशाच काही प्रश्नांना घेऊन या केस वर विचार करणार आहोत जे प्रश्न सर्वसामान्यांना पडतात मात्र तपास यंत्रणेला पडत नाही..! या घडलेल्या किसळवाण्या प्रकाराचे स्वरूप जसे आपल्याला दाखविले गेले तसेच आहे की याला आणखी काही काळोखाच्या छटा आहेत? याचा शोध घेणे हेच लोकशाहीच्या प्रयत्नांचे स्पष्ट उद्दिष्ट आहे…

 

– राहुल पवार

उपसंपादक, दै. लोकशाही

 

Leave A Reply

Your email address will not be published.