लोकशाही न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम घरोघरी पोहोचवा, त्यांची विकासाची दृष्टी अमाप आहे. महायुतीमध्ये एकजूट ठेवा, विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केला. कोल्हापूरमधील महायुतीच्या पदाधिकारी मेळाव्याला संबोधित करताना ते म्हणाले, ही निवडणूक लोकसभेसाठीची नाही, तर देशाच्या विकासाची आहे, त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूर दौऱ्यांवर आले होते. यावेळी त्यांनी हॉटेल पॅव्हेलियनमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर रात्रीच्या सुमारास मधुसूदन हॉलमध्ये पदाधिकार्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार निवेदिता माने, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर आदी नेते उपस्थित होते.
चारीमुंड्या चित करा
मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, यंदाची लोकसभा निवडणूक ही केवळ लोकसभा निवडणूक नसून ती विकासाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक आहे. गेल्या 50 वर्षात जे देशाच्या विकासाला बाधक ठरले, ज्यांनी देशाला आणि राज्याला मागे ठेवले, त्यांना चारीमुंड्या चित करण्याची ही निवडणूक आहे.