प्रभाते मनी राम चिंतीत जावा

0

करुणाष्टक निरूपण: समारोप

जागतिक महामारीच्या गेल्या अडीच तीन वर्षात अगतिक झालेल्या जीवाला थोडासा आंतरिक  दिलासा- आधार  हवा होता. सर्वच पातळीवर झालेली उलथापालथ पाहून कासावीस झालेला जीव “सर्वसत्ताधीश” अशा परमेश्वरासमोर नतमस्तक झाला नसेल तर नवलच.

याच  पार्श्वभूमीवर आपण समर्थ रामदास स्वामींच्या करुणाष्टकांचे चिंतन केले. “लोकअध्यात्म” या सदराखाली हे विवेचन झाले. अध्यात्म हे लोकांसाठीच, जनमानसासाठीच  असते. प्रत्येक व्यक्ती त्याची पाईक होऊ शकते. तिचा तो अधिकार असतो. विशिष्ट वर्गाची, वर्णाची, प्रांताची मिरासदारी या अध्यात्मावर नाही. तर तो प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. व्यक्ती घडली की समाज, राष्ट्र, देश आपोआप उन्नत  होतात. समर्थ रामदास स्वामींच्या संपूर्ण वाड़मयात  सुलभ सहज अध्यात्मच आहे. त्यावरच उभारलेले समाजकारण, धर्मकारण व राजकारण याचा त्यांनी पुरस्कार केला.

“प्रभाते मनी राम चिंतीत जावा” असा उपदेश मनाच्या श्लोकातुन त्यांनी केला आणि मनाला सज्जन करण्यास प्रवृत्त केले. पुढे त्यांच्या साधन काळातील करुणाष्टकात “तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो” म्हणुन भक्ताला अंतर्मुख करून उत्तम भक्त, दास, उपासक होण्यास प्रवृत्त केले. त्यांनी घडविलेला निर्भय, कणखर भक्त मग दासबोधातील, “देव मस्तकी धरावा अवघा हल्लकल्लोळ करावा” या पात्रतेला येऊन मिळाला.

भक्तीचा प्रांत अथांग खोल आहे. नित्य पूजा, अर्चा, पोथीवाचन, उपवास, व्रत- वैकल्ये, दानधर्म करणे यांहून अधिक असे अभिप्रेत आहे. राममुर्ती दैवी गुणसंपदा आपल्या ठायी मुरवून आपल्याला अंतरंगात ही मूर्ती जागवयाची आहे हा बोध घ्यायचा आहे. समर्थांच्या करुणाष्टकांच्या फुटपट्टी ने आपल्याला आपली भक्ती मोजायची आहे. सामान्य माणूस व त्याची भक्ती व समर्थ रामदास स्वामींना अभिप्रेत असणारी भक्ती हे अंतर आपल्याला कापायचे आहे. हे जरी उमजलं व कळलं तरी खुप काही गवसलं असं होईल.करुणाष्टकातुन आपण समर्थ रामदासांचे स्वानुभव, त्यांच्या भक्तीतील अर्थ, त्यांची अंतःप्रेरणा, दर्शनाची त्यांना लागलेली ओढ किंवा साधना काळातील व्याकुलता, उदासीनता हे सारं निर्मळ मनान त्यांनी व्यक्त केले.

जणु काही ते वाचताना आपल्यालाही आपले प्रतिबिंब त्यात नकळत दिसते. म्हणुन सर्वसामान्यांना ती भावली व पुजेनंतर पठणात त्यांचे स्थान अक्षय बनले. आपणही म्हणू लागलो “संसार चिंता चुकवी समर्था” सामान्य माणसांना त्यांचा खुप आधार वाटला. दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे मार्गदर्शन ठरले. सगुणभक्ति कडुन निर्गुणाकडे मार्गक्रमण होते. भावभक्ती व शक्तीमुळे साधना छान घडते. आपल्या चुकांची कबुली द्यायला व ती सुधारण्यासाठी आपण शिकले पाहिजे. कुठे व कसे धावते  हे मन.  त्याची धाव किती, त्याचं श्रेष्ठत्व  तितकंच खरं हे कळलं. बुद्धीला कसे वळण द्यावे लागते. विवेक, वैराग्य, क्षमा ,दया, शांती, प्रेमभावना, गुरुनिष्ठा, ईश्वरनिष्ठा अंगी बाणा वयाची आहे. ही सारी दैवी गुणसंपदा आपल्या अंतरंगात प्रस्थापित झाल्यावर रामराया तेथे आरुढ  होणार आहे असा हा प्रवास आहे निरंतर, अनंताचा.

आपण या वळणावर येऊन पोहोचलो आहोत की, “नादातुनी नाद निर्मितो,  श्रीराम जय राम जय जय राम I” हा आपल्याला ऐकावयाचा व निर्गुणी सुंदर आहे राम. याचा अल्प का होईना अनुभव घ्यायचा आहे. निर्गुणी सुंदर आहे राम असा श्रीराम सुशोभित विराजमान काही काळात होतच आहे. सुमंगलाची पहाट झाली आहे आता कुठलीही आग्रही अशी भूमिका न घेता कुठलेही गालबोट न लावता राम रायाचे दर्शन करावयाचे आहे. चलो आयोध्या. मनात आनंदात नाचायचे आहे. उत्तम रामभक्त होऊन समर्थ रामदास स्वामींनी करून घेतलेल्या साधनेने संत म्हणुन त्यांना धन्यता वाटेल असे उत्तम कार्य आपणच करावयाचे आहे.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका – भाग्यरेखा पाटोळे 

    कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.