विव्दत्ता व ज्ञानाबरोबर उत्तम पुरुष हे लक्षण गरजेचे

0

करुणाष्टक – 27

नको द्रव्य -द्वारा नको येरझारा I
नको मानसीं ज्ञानगर्वे फुगारा II
सगुणीं मना लाविं रे भक्तीपंथा I
रघूनायका मागणें हेंचि आता II

“जयाचे ऐहिक धड नाही I तयाचे परत्र पुसशी काई ?” असा समर्थांचाही सवाल आहे. पण जेव्हा धन हे साधन न राहता माणसाचे साध्य बनते त्यावेळेस या वित्ता पाठोपाठ नऊ दोष निर्माण होऊ शकतात. एक तर गर्व निर्माण होतो. माझ्यासारखा कुणी नाही. भर्तृहरी म्हणतो, “संपत्ती मिळाली की मनुष्य सर्व काही होतो. ज्याच्याजवळ धन आहे तो कुलीन, पंडीत, बहुश्रूत, विद्वान,गुणज्ञ, वक्ता, सुंदर सर्वकाही ठरतो”. तात्पर्य, सर्व गुण सोन्याचा आश्रय घेतात. पण धना पाठोपाठ गर्व, त्याच्यापाठोपाठ मस्ती आली की इतरांनी माझ्यापेक्षा श्रीमंत असू नये असा मत्सर तो करायला लागतो. मत्सर करायला लागला की त्याच्या मनामध्ये भय निर्माण होते. आपली संपत्ती जाईल का ? ती जाऊ नये म्हणुन त्याच्या ठिकाणी द्वेष येतो. असे सहा दोष सहज येतात. मग परस्त्रीची अभिलाषा, मद्यपान करावेसे वाटणे व द्दुत खेळायला प्रवृत्त होणे हे अवगुण येतात.

“वेचोनिया धन उत्तम व्यव्हारे” हे बाजुला राहते व मनुष्य असा धनाबरोबर वाहत जातो. म्हणून तर समर्थ सावध करत आहेत, “नको द्रव्यदारा”. मनुष्य तृप्त होत नाही. कुठे थांबावे हे कळत नाही आणि त्यातून मग ‘येरझारा’ सुरू राहते. धंदा -व्यापार याचा व्याप इतका असतो की, मग भगवंत प्राप्तीसाठी वेळच शिल्लक राहत नाही. “पुनरपि- जनन, पुनरपि मरणं” हे चक्र चालुच राहतं कारण बुद्धीवर अंकुश नसल्याने माणसाच्या इच्छा, कामना दिवसेंदिवस वाढत राहतात.

बुद्धीला इच्छेची जोड मिळते व माणसाचे पतन होते. बुद्धीला बोधाची जोड असेल तर काहीच हरकत नाही. जनकराजा नाही ! त्याच्या म्यान्यात ज्ञानाची तलवार होती ते वैभव संपन्न होते. तरी कोणताही दोष त्यांच्या ठायी नव्हता. पण सामान्य माणसाच्या बाबतीत घसरण्याची क्रिया फार जलद घडते. अवनती होत राहते. पैशा बरोबर असमाधान, अतृप्ती, अशांती अविवेक हे शत्रु चोरपावलाने प्रवेश करतात व “निजीध्यास तो सर्व तुटोनी गेला I बळे अंतरी शोक संताप ठेला II” अशी स्थिती होते. या संसाररूपी तुरुंगात आपण अडकुन जातो, बाहेर पडता येत नाही. म्हणून द्रव्याची अभिलाषाही खुप नको व जन्ममरणाची येरझार चुकावी म्हणून समर्थ प्रार्थना करतात व पुढे म्हणतात, “नको मानसी ज्ञानगर्वे फुगारा” पंडित असला की जबरदस्त अहंकार असतो.

खरंतर “विद्या विनयेन शोभते” पण बहुतेक वेळा विद्येबरोबर अहंकारच येतो. मी शहाणा, माझा अभ्यास खूप, मला सार कळतं. मग तो कोणाचं ऐकून घेण्याचा मनस्थितीतच नसतो. तो बोलतानाही ठसक्यात बोलतो, आम्ही’ विद्यापिठात’ राहतो. ज्ञानाचा त्याला गर्व होतो पण खरी मनःशांती, आत्मतृप्ती यापासून तो दुरावतो व पुस्तकी ज्ञानात त्याचं विश्व बंदिस्त होते, सीमित होते किंवा विद्या उदंड शिकला पण प्रसंगमान चुकतची गेला असाही संभव असतो. ‘अर्धवट शहाणे’ असे बिरुदही कधी कधी लागत म्हणून विद्देबरोबर, ज्ञानाबरोबर ‘उत्तम पुरुष’ लक्षणे ही मनुष्याच्या ठिकाणी लागतात तेव्हा तो सज्जन माणसात सामावला जातो. नाहीतर कठोरपणा, ताठपणा, अहंगंड यामुळे लोक त्याच्यापासून चार हात दुर राहतील व त्याच्या ज्ञानाचा त्याला स्वतःला व समाजाला काहीही उपयोग होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, तु गर्वाने फुगून जाऊ नकोस. तुला ‘योग्यांचा राजा’ व्हायचं असेल, ‘ज्ञानियाचा राजा’ बनवायचे असेल तर तु गर्व सोडून वैराग्यशील हो. क्षमा, शांती व दया धारण करणारा हो. नाहीतर ज्ञान असून ‘दैन्यवाणे’ जीवन तु जगशील. जगमित्र होणे तुला जमणार नाही.

बुद्धीपेक्षा भावानं देव आकळतो. बुद्धी भावासकट असेल तर निर्गुण-सगुण परमेश्वर ठायी पडतो. पण अडथळा करणे बलवान असे मन मध्ये येते. मन जर सज्जन असते तर त्याला भक्तिमार्गाने जा असे सांगावे लागले नसते. पण त्यातल्या त्यात सगुणभक्ती ही सर्वसामान्यांना पचण्यासारखी असते. कर्म,योग, ज्ञान हे मार्ग अवघड आहेत. भक्तीमार्गाची गोडी लागु शकते. चुक सुधारण्याची संधी इतर मार्गांपेक्षा अधिक असते. अहितकारक ते टाळावे, चांगले हितकारक ते निष्ठेने स्वीकारावे ह्या भक्ती मार्गात बुद्धी कमी, शरीर कष्टविले जाते.

निराळ्या धार्मिक व सामाजिक कार्यात मनुष्यबळाची फार आवश्यकता असते. अंग मोडून राबावे लागते. अमुक काम प्रतिष्ठाचे, अमुक काम कमीपणाचे हा भाव जातो. भगवान श्रीकृष्णाने धर्मराजाच्या राजसुय यज्ञात उष्टी काढली होती, हा आदर्श पुढे ठेवून धार्मिक परंपरेत रुढ असलेले यज्ञयाग, उत्सव, महोत्सव, देवपुजा, देवालयाची व्यवस्था, आई-वडिलांना सुख, आदरणीय संतांची सेवा प्रामाणिकपणे करावी. मनबुद्धीला वळण लावण्यापूर्वी इंद्रियांना वळण लावावे म्हणुन पुजा-अर्चा, महंतांचे आदर-सत्कार आदराने करावेत. म्हणुन समर्थ म्हणतात,”सगुणीं मना लाविं रे भक्तीपंथा” निर्गुण निराकारामध्ये मन रमणे ही गोष्ट फार कठीण आहे. ते साधले आहे असा भ्रम निदान साधकाने तरी बाळगु नये.

सगुण भक्ति हे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी यांना चांगले वळण लावण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे. तिच्याकडे पाठ फिरवणे हे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. सगुणसेवेवर समर्थांचा विशेष कटाक्ष होता. आपल्या दासबोधात म्हणुनच ते सांगतात, मुक्त क्रिया प्रतिपादी I सगुणभक्ति उच्छेदी I स्वधर्म आणि साधनं निंदी I तो एक पढतमूर्ख II

II जय जय रघुवीर समर्थ II
लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.