खामगांव पोलीस विभागात सावळा गोंधळ ! वरिष्ठांनो उघडा डोळे बघा नीट

0

गणेश भेरडे, खामगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जेथे नाफेडचा हरभरा चोरी प्रकरणातील चोरीचा माल विकत घेणारा जय किसान खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांना अभय मिळते तेथे इतर बाबतीत काय? असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो. शहरात अवैध धंदे जोमात सुरु आहेत. शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्द तर वरली मटका, गुटखा व अवैध दारु विक्री, चोरटी गौण खणिज वाहतुक यासारख्या अवैध धंद्यांचे माहेरघरच बनले आहेत. मस्तान चौक, बर्डे प्लॉट भागात तर मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा साठा केला जातो. त्यामुळे गुटखा मिळणार नाही असा गल्ली मोहल्ला, पानटपरी शोधूनही सापडणार नाही. पण याकडे लक्ष देणार कोण? अशी अवस्था आहे.

२९ जानेवारीला शहर पोलीसांनी पकडलेला गुटखा शहर हद्दीत आला म्हणून पकडला गेला. शिवाजीनगर हद्दीत गेला असता तर गडप झाला असता यात शंका नाही. अवैध धंद्यासंदर्भात यापूर्वी लोकशाहीने वृत्त प्रकाशित करताच दखल घेण्यात आली, तीही थातूर मातूर कारवाईने. २७ जानेवारीला एलसीबीने घाटपुरी रोडवरील चोपडे यांच्या मळ्याजवळील चौफुलीवर वरली मटका पकडला. यानंतर शिवाजी नगर पोलीसांना जाग आली व सजनपुरी येथे वरली मटका पकडला. यामुळे अवैध धंदे बंद झाले असे म्हणता येणार नाही. कारण बंटीच्या कव्हरेज क्षेत्रातील अवैध धंदेवाईकांचे धंदे सर्रास सुरु आहेत. बंटीची प्रशासनात मजबुत पकड आहे. त्यामुळेच कारवाईचा बडगा उगारला जात नसावा.

गुटख्याची एक गाडी पकडली अन दुसरी गाडी सोडली

शहर पोलीसांनी २९ जानेवारी रोजी मध्यरात्री ९ वाजताच्या सुमारास सुटाळा खुर्द बस थांब्यावर नाकाबंदी करुन नांदुराकडुन गुटखा घेऊन येणारी कार पकडली. यावेळी ९० हजार ५०० रुपयांच्या गुटख्यासह २ लाख ६१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी दोघांना ताब्यात घेतले. यावेळी लाखाचा गुटखा पकडला. पण याच दिवशी दुसऱ्या चारचाकी वाहनातून जलंबकडे जाणारा लाखोचा गुटखा मात्र सोडून दिला. गुटख्याच्या तोडीतच फार मोठी तोडी झाल्याचे बोलले जात आहे. तर हा प्रताप नाफेड हरभरा चोरी प्रकरणात उर्वरित आरोपींना अभय देणाऱ्याने केला असल्याची चर्चा आहे.

ते दोघे वाहतूक शाखेतच

मागीलवर्षी अमरावती परिक्षेत्राचे आय.जी. खामगांव दौऱ्यावर येत असताना त्यांनी अकोला रोडवर वसुली करताना ४ वाहतुक पोलीसांना रंगेहाथ पकडले होते. यावेळी तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी वाहतुक शाखाच बरखास्त करुन टाकली होती. तर या चौघांना मुख्यालयी अटॅच करुन एकाला निलंबितही केले होते. तसेच यांची कधीही वाहतुक शाखेत नेमणुक करु नये असे आदेशही त्यावेळी दिले असल्याचे समजते. पण आश्चर्य बघा यातील तत्कालीन निलंबित कर्मचाऱ्यासह दोघे सध्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये वाहतुक शाखेतच कार्यरत आहेत. ही सर्व बंटीची कमाल असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बंटी व आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी ‘कुहाडीचा दांडा’ गोतास काळ ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण काय? म्हणतात ना. दुभत्या जनावराच्या लाथाही गोड लागतात तसाच काहीसा प्रकार लक्ष्मी लोभापोटी सर्रास सुरु आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. एकंदरीतच ‘आभाळ फाटलं कुठे कुठे शिवणार’ अशी अवस्था झाल्याचे दिसून येत आहे तुर्त एवढेच.

 

Leave A Reply

Your email address will not be published.