जिल्हाधिकारी स्वच्छतादूत बनून थेट बसले घंटागाडीत

स्वच्छता मोहिमेत स्वतः जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जामनेर येथे भेट देत स्वतः स्वच्छता पंधरवडा अंतर्गत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी  कर्मचाऱ्यासोबत स्वतः साफसफाई केली इतकेच नव्हे तर आयुष प्रसाद यांनी स्वतः कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडीत बसून याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली.

देशभरात स्वछता पंधरवडा राबविण्यता येत आहे. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये स्वछता पंधरवडा राबविण्यात येत असून मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानुसार जामनेर नगरपालिका ही देश पातळीवर सर्वात स्वच्छ नगरपालिका म्हणून ओळखण्यात यायला पाहिजे. सर्वात स्वच्छ आणि सुंदर असणाऱ्या नगरपालिकेचा दरवर्षी  राष्ट्रपतींकडून स्वच्छता सर्वेक्षणानुसार दिल्लीमध्ये सत्कार केला जातो. म्हणून महाराष्ट्र स्तरावर जामनेर नगरपालिकेला नेहमी सन्मान मिळाला आहे म्हणून आता राष्ट्रीय स्तरावर देखील जामनेर नगरपालिका स्वच्छतेमध्ये प्रथम यावी असा मानस मंत्री गिरीश महाजन यांचा असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

यासाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी मिळून नियोजन करत आहेत.  कचरा टाकण्यासाठी जागा, लोकांमध्ये जनजागृती, अतिक्रमणमुक्त नगरपालिका,  प्लास्टिक मुक्त शहर,  बाजरपेठा स्वच्छ करण्यासाठी कचरा पेट्या, घंटागाड्या आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायची आहे. म्हणून सर्व जामनेरकरांनी या अभियानात आपला हातभार लावून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

तसेच यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवावा. यासाठी फक्त आपल्या घरापुरतीच मर्यादित न राहता गाव शहर देखील स्वच्छ ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. प्रत्येक सणासुदीच्या दिवशी आपण स्वछतेसाठी मोहीम राबविणार आहोत. या मोहिमेत प्रत्येक नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी मिळून पुढाकार घेऊन दर दिवशी सकाळ संध्याकाळ स्वछता मोहिमेत आपला हातभार लावावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.