धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा जागीच मृत्यू

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

धावत्या रेल्वेतून पडून परप्रांतीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शिरसोली ते दापोरा दरम्यानच्या जानता राजा शाळेजवळ बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आली. तरुणाच्या आधारकार्डवरुन ओळख पटली असून याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईतील गोवंडी भागातील शिवाजी नगर परिसरात संतोष घनश्याम राजभर (वय ३५, रा. उत्तप्रदेश) हा तरुण वास्तव्यास होता. उत्तरप्रदेश येथे आपल्या मूळगावी जाण्यासाठी मुंबईहून बसला होता. दरम्यान रेल्वेने प्रवास करत असतांना शिरसोली ते दापोरा दरम्यान अपलाईनवरील खांबा क्रमांक ४१३ / १२ ते १४ जानता राजा शाळेजवळ रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

यासंदर्भात शिरसोली स्टेशन प्रबंधकांनी तालुका पोलिसांना तात्काळ माहिती दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, संजय भालेराव, अनिल मोरे, अनिल फेगडे व उमेश ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत तरुणाची झडती घेतली असता त्याच्या खिशात आधारकार्ड मिळून आले. त्यावरून त्या तरुणाची ओळख पटली.

याप्रकरणी स्टेशन प्रबंधकाच्या खबरीवरुन तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आधारकार्डवरुन तरुणाची ओळख पटल्यानंतर तात्काळ तरुणाच्या कुटुंबियांशी पोलिसांनी संपर्क करुन घटनेची माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.