जळगाव : – महापालिकेच्या घरपट्टी विभागाच्या वेळेत वाढत्या तापमानामुळे बदल करण्यात आला आहे. सकाळी ८ ते १ व सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत घरपट्टी विभागात मालमत्ता कर स्विकारण्यात येणार आहे. तसेच सुटीच्या दिवशी देखील घरपट्टी विभाग सुरु राहणार आहे.
जळगाव शहराच्या तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ झाली असून मंगळवारी तापमानाचा पारा ४५ अंशावर गेला होता. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हात फिरल्यामुळे उष्मघात होण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता मनपा प्रशासनाने घरपट्टी भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हाचा फटका बसू नये म्हणून मालमत्ताकर भरण्यासाठी चारही प्रभाग समिती कार्यालयांच्या वेळेत बदल केला आहे.
सकाळी ८ वाजेपासून महापालिकेच्या घरपट्टी विभागात कर भरणा सुरु करण्यात येणार असून दुपारी १ वाजेपर्यंत मालमत्ता कर भरणा सुरु राहणार आहे. तसेच सायंकाळी ४ वाजेपासून पुन्हा कर भरणा सुरु होणार असून ७ वाजेपर्यंत कर भरणा सुरु राहणार आहे.