रेल्वेतून पडणाऱ्या महिलेचे प्राण वाचविणारे दिनेश बडगुजर यांचे पोलीस अधीक्षकांकडून अभिनंदन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत असताना पाय निसटून रेल्वे व प्लॅटफॉर्मच्यामध्ये खाली पडत असतांना प्रसंगावधान राखुन क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून महिलेचा जीव वाचवणाऱ्या पोहेकॉ दिनेश विश्वनाथ बडगुजर यांचे महाराष्ट्र पोलीस दलाकडून कौतुक करण्यात आले.

दिनांक. १५/०२/२०२२ रोजी जळगाव रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ०२ वरुन पुण्याकडे जाणारी रेल्वे नं. ११०४० गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेसने वेग घेतला असतांनाच सुनिता पांडुरंग बेडीस (वय ५२, रा . शिवशक्तीनगर, भोलेबाबाबा दरबारच्या पाठीमागे चाळीसगाव) ही महिला धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत असतांना पायऱ्यांवरून पाय निसटून रेल्वे व प्लॅटफॉर्ममध्ये खाली पडत असतांना पोहेकॉ दिनेश विश्वनाथ बडगुजर यांनी प्रसंगावधान राखून क्षणाचाही विलंब न करता स्वतःचा जीव धोक्यात घालुन जीवाची पर्वा न करता सदर महिलेस वर ओढुन तीचे प्राण वाचविले.

पोहेकॉ दिनेश विश्वनाथ बडगुजर यांनी दाखविलेले धैर्य, धाडसीवृत्ती व शौर्याबद्दल जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बडगुजर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच जळगाव जिल्हा पोलीस दलास सार्थ अभिमान आहे. आपल्या या उत्कृष्ट व प्रशंसनीय कार्याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करतो. आपण यापुढे भविष्यात देखील असेच उत्कृष्टपणे कर्तव्य व जबाबदारी पार पाडाल आणि महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेमध्ये भर टाकाल अशी अपेक्षा मुंढे यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.