जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आजच्या पुरोगामी महाराष्ट्रात अजून देखील मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जातो. वंशाचा दिवा पाहिजे म्हणून अनेक महिलांचा छळ केला जातो. जळगाव शहरातील वाघनगर भागात राहणाऱ्या पल्लवी योगेश पाटील (वय ३५) या विवाहितेचा रविवार २४ डिसेंबर २०२३ रोजी संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान तिचा घातपात झाल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. मृत्यू झालेल्या विवाहितेला दोन मुली असून मुलगा होत नसल्याने विवाहितेचा सासरच्यांनी छळ केल्याचा गंभीर आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. तर विवाहिता कोसळल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सासरच्या मंडळींचे म्हणणे आहे.
जळगावातील वाघनगर परिसरात पल्लवी पाटील या वास्तव्यास होत्या. त्यांचे पती जिल्हा परिषदमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरीला असून, त्यांना दोन मुली आहेत. रविवारी पल्लवी पाटील यांच्या मृत्यूविषयी कुटुंबीयांनी त्यांच्या माहेरी फोन केला तुमची मुलगी कोसळल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे माहेरची मंडळी सासरी पोहोचली. त्यांनी विवाहितेचा मृतदेह बघितला असता त्यांना विवाहितेच्या मानेवर गळफास घेतल्याचे व्रण दिसून आले, तसेच त्यांच्या पोटावर मारहाणीच्यादेखील जखमा असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. विवाहितेने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप करीत संशय व्यक्त केला. विवाहितेचा छळ झाल्याने त्या कोरोनाकाळात दहा महिने माहेरीच होत्या. मात्र, त्यानंतर त्या पुन्हा सासरी नांदण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर मयत पल्लवी पाटील यांचे वडील गणेश चौधरी, भाऊ मंगेश चौधरी यांच्यासह नातेवाइकांनी मोठ्या प्रमाणात आक्रोश केला. तसेच आपल्या बहिणीला न्याय मिळावा, अशी मागणी मंगेश चौधरींनी केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.