२०० दिव्यांगांची मोफत आरोग्य तपासणी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जिल्ह्यात उडाण दिव्यांग प्रशिक्षण केंद्र (Udaan Divyang Prashikshan Kendra) दिव्यांगांसाठी केले जाणारे कार्य कौतुकास्पद आहे. आपल्या घरात जन्माला येणाऱ्या बाळाची वाढ योग्य पध्दतीने होत नसल्यास वेळीच लक्ष देणे आवश्यक असते. शासनाकडून देखील समाजातील अशा घटकांसाठी विविध योजना, उपक्रम राबविले जातात. दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांशी शासकीय यंत्रणांना कसे जोडता येईल यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत (Collector Dr. Abhijit Raut) यांनी दिली.

रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित ‘उडाण’ व गोदावरी फाऊंडेशनतर्फे (Godavari Foundation) बुधवार, दि.१० ऑगस्ट रोजी दिव्यांगांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते. शिबिराच्या उद्धाटनप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, प्राचार्य डॉ. जयवंत नागोलकर, डॉ. उमाकांत अनेरेकर, उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी आदी उपस्थित होते.

शिबिरात मार्गदर्शन करताना डॉ. केतकी पाटील यांनी दिव्यांगाचा एक धागा धरून आज इतके लोक जुळले. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. दिव्यांग मुलांना सांभाळायचं काम एक आईच चांगल्याप्रकारे करू शकते. उडाण सर्व आईंनी मिळून तयार केले असल्याने ते उडाण घेणार हे निश्चित आहे. स्पेशल मुलांच्या आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेणे ही आपली एक नागरिक म्हणून जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड म्हणाल्या, माणसांची नेमकी प्रगती कशी होते व काय होते हे सर्वांना माहिती आहे. अगोदर मातीची घरे होती नंतर आरसीसीचे बंगले आले तरीही मनुष्याला समाधान नाही. खरे समाधान तर या लहानशा लेकरांमध्ये आहे असे आयुक्त डॉ. गायकवाड म्हणाल्या.

महापौर जयश्री महाजन यांनी डॉक्टर नसून देखील दिव्यांगांसाठी काम करणे ही भावना खूप मोठी आहे. दिव्यांगांना सांभाळणे खूप जिकरीचे आणि जबाबदारीचे काम असते. उडाणच्या माध्यमातून शेकडो मुलांचा सांभाळ केला जात आहे, सर्वांनी त्यातून बोध घेणे आवश्यक आहे. दिव्यांग मुलांना देवाने जन्मतः काही विशेष गुण दिलेला असतो. ते जे काम करतात ते प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पध्दतीने करतात. आपण देखील त्यांच्या इच्छेला जोड देण्याचे कार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

शिबिरात ० ते २५ वयोगटातील आणि प्रामुख्याने ० ते ६ वयोगटातील दिव्यांगांची सुमारे ५ हजार रुपयांची मोफत तपासणी करण्यात आली. त्यात शिबिरात मोफत ईसीजी कार्डिओग्राफ, मधुमेह, रक्तदाब तपासणी केली जाणार आहे. याशिवाय कान-नाक-घसा विकार, नेत्रविकार, हृदयविकार, मेंदू व मणका विकार, अस्थिरोग, बालरोग, नवजात शिशु रोग, त्वचारोग, मानसिक आजारांची तपासणी करण्यात आली. पुढील आवश्यक उपचार डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केले जाणार आहेत. शिबिरात नवजात शिशु तज्ञ्, बालरोग तज्ञ यांच्याकडून प्रत्येक बालकाची तपासणी, बालकांच्या वाढीत येणाऱ्या अडचणी, तसेच स्पीच थेरीपीस्ट, सायकोलॉजिस्ट, कॉन्सिलर, त्वचा रोगतज्ञ यांच्याकडून तपासणी आणि शिक्षणातील अडचणीवर सल्ला मार्गदर्शन करण्यात आले.

शिबिरासाठी गोदावरी फाऊंडेशन व जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी, माजी खा. डॉ.उल्हास पाटील, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला वर्मा यांनी, प्रास्ताविक स्वाती ढाके यांनी केले तर आभार उडाणच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांनी मानले. शिबिरासाठी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेनन, विनोद बियाणी, समाजकल्याणचे  भरत चौधरी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे एस.पी. गणेशकर, पल्लवी चोपडे, अभिषेक बाफना, आयुषी बाफना यांची उपस्थिती होती. तसेच उपक्रमासाठी प्रवीण चौधरी, योगेश चौधरी, जयश्री पटेल, सोनाली भोई, सुनील महाजन, आर.व्ही.कोळी, प्रशांत रोटे, चेतन वाणी, हेतल पाटील, राहुल निंबाळकर, तुषार भामरे, रजत भोळे आदींनी परिश्रम घेतले.

शिबिरात डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग तज्ञ डॉ. उमाकांत अनेकर, फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. निखिल पाटील, मेडीसीन डॉ. अब्दुल्ला मोमीन, अस्थीरोग डॉ. पियुष पवार, नेत्रविकार तज्ञ डॉ. शिफा मिर्झा, त्वचा विकार डॉ. सागरिका धावणं, मनोविकार डॉ. मोहम्मद सकीत, फिझीओथेरपिस्ट डॉ.प्रीती पाटील, डॉ. तेजस्विनी वाणी, डॉ. कृतिका, डॉ. कौस्तुभ यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना नर्सिंग स्टाफचे प्रतीक्षा बालवीर, विशाल सोनुने, प्रीती भाले, नितीन नाईक यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.