रुग्णवाहिका ठेकेदाराला अधिकाऱ्यांची ‘राजछाया’!

आदेश देवूनही मानधन नाही : आयुक्तांकडे दिखावू पत्रव्यवहार

0

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिका ठेकेदार मनमानी करीत असतांनाही आणि त्याच्या मनमानीला चालक कंटाळले असतांनाही अधिकाऱ्यांनी मक्तेदारावर दाखविलेली ‘राजछाया’ संशयाच्या भोवऱ्या सापडली आहे. प्रशासकीय पातळवर होत असलेला पत्रव्यवहार हा केवळ दिखावू असल्याचे समोर आले आहे. आरोग्य भवन येथील सहसंचालकांकडून कारवाई अपेक्षित असतांनाही ते ठेकेदाराला कशासाठी पाठीशी घालत आहेत हाच प्रश्न चालकांना भेडसावत आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्हा सामान्य रुग्णालयातील 102 रुग्णवाहिकेवरील चालकांच्या अडचणी दरदिवसाला वाढतच असतानाही ते कामावर रुजू आहेत. गेल्या चार महिन्यांपासून मानधन थकले असतांनाही ते कर्तव्य बजावत असतांनाही त्यांच्या अडचणी सोडविण्यावर अधिकारी भर देण्याऐवजी ठेकेदाराला ‘राजछाया’ देण्यात मग्न दिसून येत आहेत. जबाबदार अधिकारीच या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने चालकांना आंदोलनाचे शस्त्र हाती घ्यावे लागणार आहे.

महाजनांची भेट तरीही हालचाल नाही!
जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेवून त्यांना ठेकेदाराच्या मनमानी विरुद्ध निवेदन देखील दिले. मंत्री गिरीश महाजन यांनी सहसंचालकांशी भ्रमणध्वनीवरुन चर्चा देखील केली मात्र कुठल्याही प्रकारची हालचाल झालेली दिसून येत नाही. जिल्हा रुग्णालयातील समस्या सोडविण्याकडे मंत्री गिरीश महाजन यांचा कल असतो. मात्र रुग्णवाहिका चालकांच्या गंभीर प्रश्नाकडेच दुर्लक्ष होणे क्रमप्राप्त नाही. मंत्री गिरीश महाजन, पालकंमत्री गुलाबराव पाटील यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

ठेकेदाराला ‘राजछाया’
जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिकेचा ठेका मुंबई येथील राजछाया इनोवेटीव्ह सर्व्हिस कंपनीकडे असून त्यांनी चालकांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन दिलेले नाही. या संदर्भात चालकांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाच्या सहसंचालकांची भेट घेवून निवेदन सादर केल्यानंतरही ठेकेदाराची मनमानी कमी झालेली नाही. अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराला ‘राजछाया’ दिली जात असल्याची शंका असून आरोग्य आयुक्तांनी यात लक्ष केंद्रीत करावे अशी मागणी चालकांकडून जोर धरीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.