विद्यापीठाची खान्देशच्या उच्च शिक्षणात उत्तम कामगिरी

0

जळगाव;- उपलब्ध असलेल्या संशाधनाच्या आधारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने खान्देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी पार पाडली असून दुर्गम, ग्रामिण व आदिवासी भागातील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेच्या पहिल्याच बैठकीत अध्यक्षांसह सदस्यांनी उपयुक्त सूचना केल्या.

विद्यापीठ कायद्यान्वये विद्यापीठ सल्लागार परिषेदेचे गठन करण्यात आले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेची पहिली बैठक या परिषदेचे अध्यक्ष तथा जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवार दि. ९ नोव्हेंबर रोजी झाली. या बैठकीस परिषदेचे सदस्य डॉ. के.बी. पाटील (माजी कुलगुरू, उमवि), प्रा. राजीव वनकर (हैदराबाद विद्यापीठ, हैदराबाद), यजुर्वेंद्र महाजन (दीपस्तंभ फाऊंडेशन, जळगाव), कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे हे उपस्थित होते. अन्य सदस्य डॉ. के.आर.एस. संबासिवा राव (माजी कुलगुरू, मिझोराम) हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

प्रारंभी प्रा.एस.टी. इंगळे यांनी प्रास्ताविक केले. कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी गेल्या तेहतीस वर्षातील विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा व विद्यापीठाच्या योजना, उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर सदस्यांनी या बैठकीत अनेक उपयुक्त सुचना केल्या. त्यामध्ये स्वयं निर्वाह आधारीत अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरु करावे, शासकीय संस्थांकडून विद्यार्थ्यांना फेलोशिप प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करावेत, ऑनलाईन लघु अभ्यासक्रम सुरु करावेत, राष्ट्रीय मानांकनात आपल्या विद्यापीठाला स्थान मिळावे यासाठी गुणवत्ता वाढीचे प्रयत्न करावे, दूरस्थ अभ्यासक्रम सुरु करावेत, आपल्या भागातील अनिवासी भारतीयांकडून विद्यार्थ्यांन शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत, दिव्यांग-ट्रान्सजेंडर यांना सुविधा पुरवून त्याबाबत धोरण आखावे, विद्यार्थी विद्यापीठ कॅम्पस व महाविद्यालयात अधिक काळ रेंगाळेल यासाठी प्रयत्न केले जावेत, काही निवडक प्राध्यापकांवर अधिक लक्ष केंद्रीत करून त्यांच्यासाठी नेतृत्व विकास कार्यक्रम राबवावा, आदिवासी विद्यार्थ्यांमधील गुण हेरून त्यांच्या गुणांना वाव मिळावा यासाठी काही उपक्रम राबवावे, माजी विद्यार्थ्यांचे संघटन अधिक मजबूत करावेत, इतर प्रदेश व जिल्ह्यांमधून या विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी प्रयत्न करावेत, आदिवासी विद्यार्थी तिरंदाजी, अॅथलॅटिक्स व रायफल शुटिंग यामध्ये अग्रेसर असतात त्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने पुढे येवून त्यांना बळ द्यावे अशा काही सूचना बैठकीत समोर आल्या.

नवीन शैक्षणिक वर्षा पासून विद्यापीठात ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस’ (अभ्यासाचे प्राध्यापक) ही कल्पना राबविली जाणार असल्याची माहिती बैठकीत कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी दिली. यावेळी अध्यक्ष अशोक जैन यांनी रसायनशास्त्र व जैवशास्त्र या विषयासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रोफेसर ऑफ प्रॅक्टीस या योजनेला आर्थिक सहकार्य जैन उद्योग समुहाकडून केले जाईल अशी ग्वाही दिली. तसेच रायफल शुटिंग, तिरंदाजी या क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी जैन उद्योग समुह विद्यापीठासोबत काम करेल असेही जैन यांनी सांगितले.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये काही ध्येय विद्यापीठाने निश्चित केले असल्याची माहिती प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी दिली. त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन दोन ते तीन पदवी अभ्यासक्रम विद्यापीठात सुरु करणे, नंदुरबारच्या आदिवासी अकादमीत समाजकार्य विषयाचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करणे, विशारद कौशल्य विकास केंद्राला बळकटी देणे, सिलेज उपक्रम, रोजगार मेळावा, उद्योग जगताकडून निधी प्राप्त करणे, आंतरविद्याशाखेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन या काही गोष्टींचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीत अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, प्रा. समीर नारखेडे, सीए रवींद्र पाटील, प्रा. योगेश पाटील, प्रा. पी.पी. माहुलीकर, डॉ. राजेश जवळेकर, प्रा.ए.एम. महाजन, प्रा. एस.आर. कोल्हे, प्रा.जे.बी. नाईक, डॉ. पवित्रा पाटील, इंजि. एस.आर. पाटील, एस. आर. गोहिल, जी.एन. पवार, डॉ. मुनाफ शेख, डॉ. सुनील पाटील निमंत्रित म्हणून उपस्थित होते.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.