मोठी बातमी; जळगाव येथील प्रसिद्ध आर. एल. समूहाच्या पेढीवर ईडीची धाड !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव मध्ये प्रसिद्ध असलेले राजमल लखीचंद ज्वेलर्स (Rajmal Lakhichand) याठिकाणी ईडीची धाड पडल्याचे वृत्त समोर येत आहे. आर. एल. समुहाच्या जळगावच्या सराफ बाजारातील पेढीवर आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या पथकाने छापा टाकून झडती घेण्याचे काम सुरु केले आहे. या ग्रुपच्या पेढीसमोर पथकाची चारचाकी वाहने लागली असून, अद्याप या बाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पथक गाड्या बाहेर लावून आतमध्ये तपासणी करत असल्याचे समजत आहे. सर्व दरवाजे बंद करून तपासणी सुरु आहे.

मंगळवारी सकाळीच सीबीआयचे पथक जळगाव शहरात सखल झाले. आर. एल. ज्वेलर्स तसेच ईश्वरबाबूजी जैन यांच्या निवास्थानांची पथकाने कसून तपासणी केली. तसेच त्यांच्या मालकीच्या ‘मानराज मोटर्स’ व ‘नेक्सा’ या दोन दालनांमध्ये तपासणी करण्यात आली. यासोबतच काल दिवसभरात आर. एल. ज्वेलर्स समूहाशी संबंधित नाशिक आणि पुणे याठिकाणी देखील छापे टाकण्यात आले आहे. यात नेमक्या कोणत्या गोष्टी जप्त करण्यात आल्या त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तथापि, या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आर. एल. समूहाने व्यवसाय वृद्धीसाठी स्टेट बँकेकडून ५२६ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. याची वेळात फेड न करता आल्यामुळे खाते एनपीए झाले आणि बँकेने याच्या वसुलीसाठी समूहाच्या चार मालमत्ता विकल्या, मात्र एवढा असूनही कर्जाची रक्कम बाकी असून हा आकडा १५०० कोटींवर पोहोचल्याचे बँकेचे म्हणणे आहे. या संदर्भात मध्यंतरी दोन्ही बाजूंनी एकमेकांना जाहीर नोटीससुद्धा बजावण्यात आल्या होत्या, या प्रकरणास एसबीआयने तक्रार केली होती. यातूनच हे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी सात ते संध्याकाळी सहा या कालावधीत ही तपासणी सुरु होती.

Leave A Reply

Your email address will not be published.