रेकॉर्डवरील गुन्हेगाराला फरार होण्यास मदत ;चौघाविरुद्ध गुन्हा दाखल

0

जळगाव – रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेण्याकरिता एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्याच्या घरी गेले असता त्याने नकार दिला. त्याचवेळी त्याच्या आईने, बहिणीने आणि साथीदाराने पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणित त्याला घरातून फरार होण्यासाठी मदत केली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण तो गल्लीबोळांचा फायदा घेऊन फरार झाला. दरम्यान संशयित आरोपीला फरार करण्यास मदत केली म्हणून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेकॉर्डवरील गुन्हेगार इष्तियाक अली राजिक अली हा तांबापुरा येथे राहतो. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक जयपाल हिरे यांनी त्याला पोलीस स्टेशनला हजर करण्याबाबत पोलीस पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ अल्ताफ पठाण, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, चंद्रकांत पाटील, महिला पोलीस नीलोफर सय्यद असे त्याच्या घरी गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गेले होते. त्यावेळी इश्तियाक अली याला ताब्यात घेत असताना त्याची आई हसीना अली हिने जोरजोरात आरडाओरडा करून पोलिसांना शिवीगाळ केली.

त्याचबरोबर इष्तियाक् सोबतचा त्याचा साथीदार अनिस पटेल यांनी देखील त्याला घेऊन जाण्यास पोलिसांना मज्जाव केला. त्याच गोंधळात इष्तियाक याची बहिण नाझिया हिने त्याला पळून जाण्यास मदत केली. तो पळत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र तो तांबापुरातील कुठल्यातरी गल्लीबोळात निघून गेला. अन फरार झाला आहे. त्याच्यावर पाच घरफोडीचे गुन्हे दाखल असून बऱ्याच गुन्ह्यात पोलिसांना तो हवा आहे.

दरम्यान पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पोहेकॉ अल्ताफ पठाण यांच्या फिर्यादीवरून हसीना अली, नाझिया अली, अनिस पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, पोहेकॉ सचिन मुंडे करीत आहेत. दरम्यान हसीना अली आणि अनिस पटेल यांना अटक करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.