मनपा प्रशासनाचे पितळ उघडे…!

0

लोकशाही संपादकीय लेख

पहिल्याच पावसाने जळगाव शहरात रस्ते गटारी यांची झालेल्या दैनावस्थेमुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे. शहरातील रस्त्यांबाबत गेल्या अनेक वर्षांपासूनची ओरड सुरू असली तरी यंदा नव्याने करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यांच्या पहिल्याच पावसात उडालेले आहे. अख्या पावसाळ्यात नवीन केलेले डांबरी रस्ते शिल्लक राहतील की पूर्ण वाहून जातील असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेले डांबरी रस्ते दर्जेदार नाहीत हेच एका पावसाने सिद्ध झाले आहे. शहरात डांबरी रस्ते तयार होत असताना त्यांचा दर्जा चांगला नाही, निकृष्ट दर्जाचे डांबरी रस्ते केले जात आहेत, असे फोटोसह उदाहरण देऊन शहरातील जागरूक नागरिक टाहो फोडून निदर्शनास आणून देत होते. तथापि जळगाव महानगरपालिकेच्या प्रशासनाने त्याची साधी दखल देखील घेतली नाही. तसेच महापालिकेत निवडून गेलेल्या एकही लोकप्रतिनिधी नगरसेवकाला यांची दखल घ्यावीशी वाटली नाही. आता पहिल्याच पावसात या डांबरी रस्त्याची दैना उडलेली असल्याने त्याला जबाबदार कोण? प्रशासनाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी साधलेल्या चुपी मागचे कारण काय? रस्ते तयार करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामाला ही मंडळी रोख का लावू शकले नाही? या प्रश्ना मागचे कारण म्हणजे कंत्राट दाराकडून मिळालेली टक्केवारी असा जो आरोप लावला जात आहे, त्यात तत्यांश आहे असे म्हणावे लागेल. अजून तर जळगाव शहरात फक्त १६ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला तरी, पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केल्याचा दावा करणाऱ्या अभियंत्यांचा दावा आता खरा की खोटा? शहरातील नालेसफाईवर तब्बल १७ लाख रुपये खर्च झाला, असे प्रशासन म्हणते. तर मग नालेसफाई कशा प्रकारच्या पद्धतीने केली गेली? याची शंका निर्माण होते. बऱ्याच वेळा नालासपाई झाल्याचा खर्च दाखविला जातो पण, प्रत्यक्षात नालेसफाई झालेलीच नसते. त्यामुळे शहराचे अभियंते म्हणत असले तरी नालेसफाईचा मात्र पहिल्याच पावसात बोजवारा उडाला एवढे मात्र निश्चित. जेसीबीने काही ठिकाणी नालेसफाई झाली, म्हणजे नाल्यातला गाळ काढून रस्त्यावर नाल्याच्या काठावर टाकला गेला. परंतु नाल्याच्या काठावर जेसीबीने टाकलेला गाळ, कचऱ्याचे ढीग उचलणार कोण? ते उचलले गेले नसल्याने पावसाच्या पाण्याने तो गाळ आणि कचरा पुन्हा नाल्यात पडतो. त्यामुळे नाले तुडुंब भरले जातात. परिणामी गाळाने तुडुंब भरलेला नाल्यातील संपूर्ण घाण रस्त्यावर येते. त्यामुळे नावाला नालेसफाई झाली, सफाई केल्याचा खर्च केला असला तरी त्या नाल्याला पूर्वीप्रमाणेच जैसे थे गाळाने भरल्याने नाल्यातील पाणी रस्त्यावर आणि रस्त्यावरील पाणी झोपड्यांमध्ये शिरते ही वस्तुस्थिती आहे. तांबापुरातील सुमारे 125 घरात पाणी शिरले अनेकांचे संसार उघड्यावर पडले. संतप्त रहिवाशांनी महामार्गावर ठिय्या मांडला. स्टेडियम परिसरात पाणीच पाणी झाले. शहरातील जयप्रकाश नारायण चौकात गुडघ्या पेक्षा जास्त पाणी रस्त्यावर साचल्याचे पायी चालणाऱ्यांची दैना उडाली. सायकलस्वार मोटरसायकली आणि चार चाकी वाहन चालवणाऱ्यांना कसरत करावी लागली. अनेक मोटरसायकलींच्या इंजिनमध्ये पाणी गेल्याने त्या बंद पडल्या. शहरातील नागरिकांच्या झालेल्या या गैरसोयीबद्दल कुणाला दोष द्यावा…?

पहिल्याच पावसाने जळगाव शहराची दैना झाली. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले. पण पाऊस आणखी झाला असतात तर कहर झाला असता. परंतु हा कहर होणार नाही याची काळजी महानगरपालिकेने घेणे गरजेचे आहे. एखादी जीवित हानी झाली तरच मनापा प्रशासनाचे डोळे उघडतील का? अशा मोठ्या घटना झाल्याशिवाय त्यांची दखल घेतली जाणार नाही का? त्यासाठी जळगाव शहरात झालेल्या नालेसफाईच्या कामाची चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाली तरच दोषी कोण हे लक्षात येईल आणि दोषी असणाऱ्यांवर तातडीने कारवाई होणे देखील गरजेचे आहे. पावसाळ्यापूर्वी जशी शहरातील नाल्यांची सफाई केली जाते, त्याप्रमाणे मनपाच्या विद्युत विभागातर्फे शहरातील विजेच्या तारांना अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. जेणेकरून झाडाच्या फांद्यांमुळे विजेचा करंट उतरून नागरिकांना शॉक लागू नये, हा त्यामागचा उद्देश असतो. महानगरपालिका प्रशासनाकडून संबंधित विभागातर्फे काही ठिकाणी झाडे तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तोडल्या गेल्या. परंतु तोडलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावरच फोडून दिल्या. त्या झाडांच्या फांद्यांमुळे रस्त्यावरील वाहतुकीला प्रचंड अडथळा तर निर्माण होत आहे. त्याचबरोबर पावसामुळे या फांद्यांच्या ढिगामुळे जी दुर्गंधी पसरते आणि त्या परिसरात रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येते त्याला जबाबदार कोण? या सर्व बाबी जळगाव महानगरपालिकेच्या प्रशासनाचा गलथान कारभार निदर्शनास आणून देण्यास सक्षम आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त मॅडम विद्या गायकवाड यांची प्रशासनावरील पकड ढिली झाली असे म्हणावे काय? एकंदरीत लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याचे यावरून दिसून येते. एकाच पावसामुळे मनपा प्रशासनाचे पितळ उघडे पडले. येणाऱ्या पावसाळ्यात मनपाची स्थिती काय होईल े सांगणे कठीण आहे. जिल्हाधिकार्‍यांनी यात लक्ष घालावे पालकमंत्र्यांनी याची दखल घ्यावी ही अपेक्षा…!

Leave A Reply

Your email address will not be published.