जळगाव शहरात १४ वर्षात गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या २० डॉक्टरांवर कारवाई

0

आठ सोनोग्राफी सेंटरच्या केसेस कोर्टात दाखल ; माहिती अधिकारातून आली माहिती समोर
जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क
खासगी रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमधील डॉक्टरांकडून गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायद्याचे पालन न करणाऱ्या २० डॉक्टरांवर मनपाच्या दवाखाना विभागातर्फे कायदेशीर कारवाई करण्यात आली असून आठ डॉक्टरांविरूध्द न्यायालयात केसेस दाखल असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
शासनाकडून राज्यात गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायद्या लागू करण्यात आला आहे. स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी या कायद्याची प्रभावी अंमलबजावली होणे आवश्यक आहे. परंतु शहरातील २० खासगी रूग्णालयांमधील सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायद्याचे पालन न करणाऱ्या २० डॉक्टराविरोधात मनपाच्या दवाखाना विभागाकडून कायदेशिर कारवाई करण्यात आली असून ८ डॉक्टरांविरोधात न्यायालयात खटले सुरु असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल नाटेकर यांनी माहिती अधिकारातून उघडकीस आणली आहे.

जळगाव मनपा हद्दीत विसनजीनगर परीसरातील डॉ. जयेश निकुंभ माऊली हॉस्पीटल, आर. जे. टॉवर्स परीसरात डॉ. तुषार नेहते यांचे सुहासिनी मॅटर्निटी होम, नवीपेठेत डॉ. राहूल कोल्हे यांचे पद्मावती हॉस्पीटल, डॉ. सुष्मा पाटील आशय हॉस्पिटल नवी पेठ, डीआयसी कॉलनीत, डॉ. नंदा जैन यांचे तारा हॉस्पीटल, पी. एम. चेंबर्स मध्ये डॉ. वंदना चौधरी यांचे वंदना हॉस्पीटल, पांडे चौकात डॉ. राहूल पाटील यांचे वंश हॉस्पीटल, आकाशवाणी चौकात डॉ. सीमा पाटील यांचे विश्वप्रभा हॉस्पीटल, बळीराम पेठेत डॉ. तुषार उपाध्ये यांचे आर्य हॉस्पीटल, सामान्य रूग्णालयाजवळ डॉ. उदयसिंग पाटील यांचे मनःशांती हॉस्पीटल, सेशन कोर्टासमोर डॉ. नितीन चौधरी यांचे निमजाई हॉस्पीटल, डॉ. राहूल कोल्हे यांचे पद्मावती हॉस्पीटल, डॉ. विनीता खडसे यांचे आराधना हॉस्पीटल, डॉ. निलेश लाठी यांचे लाठी हॉस्पीटल, डॉ. वैशाली जैन यांचे अदित न्यूरो आणि मॅटर्निटी हॉस्पीटल, डॉ. जितेंद्र कोळी यांचे डॉ. दिलीप राणे यांचे मधुदत्त मॅटर्निटी मोरया मॅटर्निटी हॉस्पीटल अॅन्ड सोनोग्राफी सेंटर, डॉ. प्रशांत जैन याचें अथर्व हॉस्पीटल, डॉ. प्रियंवदा महाजन यांचे मधुर युरोलॉजी आणि मॅटर्निटी हॉस्पीटल, डॉ. सुरेश सुर्यवंशी यांचे सुर्यवंशी हॉस्पीटल अशा २० खाजगी मॅटर्निटी हॉस्पीटलवर गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक अंतर्गत २००९ ते आतापर्यंत कारवाई करण्यात आली असल्याचे मनपा प्रशासनाने म्हटले आहे.

मनपाने तपासणी मोहिम सुरु करण्याची गरज
गेल्या दहा ते बारा वर्षापूर्वी सोनोग्राफी संदर्भात मनपा प्रशासनाकडून ८ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून कोर्टात खटले सुरू आहेत. असे असले तरी माहिती अधिकार अंतर्गत मिळालेली माहिती पहाता शहरात अनेक खाजगी रूग्णालयात सोनोग्राफी मशीनचा वापर शस्त्रक्रिया वा अन्य कारणांसाठी उपयोगात आणली जात आहे. परंतु या साहित्यांच्या आधारे अनेक ठिकाणी छुपेपणाने सोनोग्राफी मशीनचा गर्भलिंगनिदानासाठी दुरूपयोग केला जात असल्याची शक्यता आहे. मनपा प्रशासनाने याविरूद्ध तपासणी मोहीम सुरू करणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.